अमेठी - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची अमेठीमध्ये जाहीर सभा सुरू आहे. या सभेत राहुल गांधींनी माध्यमांच्या गळचेपीवरून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. सध्या पत्रकारांनी त्यांच्या 'मन की बात' केली तर त्यांना 'दंडे' पडतील. मोदी त्यांना मारतील. मात्र, पत्रकारांनो आता घाबरू नका २०१९च्या निवडणुकीनंतर जे लिहायचे ते लिहा, आमच्या विरोधातही लिहायचे असल्यास लिहा, असे राहुल गांधी म्हणाले.
पत्रकारांनो.. २०१९ नंतर जे लिहायचे आहे ते लिहा - राहुल गांधी - narendra modi
माध्यमांची गळचेपी होत असल्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
अमेठीतील जनतेला उद्देशून ते म्हणाले की, नरेंद्र मोदींनी फक्त हिंदुस्थानच्या जनतेचीच चोरी केली आहे असे नाही, चौकीदाराने सगळ्यात जास्त चोरी तुमची केली आहे. गेल्या पाच वर्षात आम्ही तुमच्यासाठी जे काही केले ते त्यांनी तुमच्याकडून काढून घेतले आहे. पंतप्रधान मोदींनी २ कोटी नवे रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. पण, वास्तव आहे की, प्रत्येक चोवीस तासात २७ हजार तरुण नोकऱ्या गमावत आहेत. आम्ही २२ लाख सरकारी जागा भरण्यासह पंचायत स्तरावर १० लाख तरुणांना रोजगार देऊ. नोटबंदीच्या वेळी नरेंद्र मोदींनी मेहनती आणि इमानदार लोकांच्या खिशातून पैसे काढून घेतले. अनिल अंबानी, नीरव मोदी यांच्यासारखे लोक तर बँकांच्या बाहेरील रांगात नव्हतेच.
जेव्हा भाजप नेते येऊन त्यांची खोटी भाषणे बोलून दाखवतील तेव्हा त्यांना विचारा त्यांच्या सरकारने अनिल अंबानीला ३० हजार कोटी का दिले आणि त्याच्या बदल्या त्यांनी तुम्हाला काय दिले?. माझे ध्येय अमेठीला शिक्षणाचे केंद्र बनवण्याचे आहे. यासाठीच आम्ही 'एफडीडीआई', 'राजीव गांधी इंस्टीट्यूट ऑफ पेट्रोलियम टेक्नोलॉजी' आणि इतर शैक्षणिक संस्थाची स्थापना केली, असे ते म्हणाले.