पाटणा -लोकसभा निवडणुकांना ५ दिवस शिल्लक आहेत. त्या पार्श्वभूमिवर सर्वच पक्ष संपूर्ण ताकद लावून प्रचार करत आहेत. त्यासाठी त्यांनी विविध मार्गाचा अवलंब केलेला दिसतो. मात्र, बिहार येथे प्रचारासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करण्यात येत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रचार करण्यासाठी हे चिमुकले भर उन्हात त्या पक्षाचे झेंडे घेऊन अनवानी पायांनी फिरताना दिसतात.
लोकसभा निवडणूक म्हटली की संपूर्ण देशभरात एका मोठ्या सणाची तयारी असल्यासारखे वाटते. त्यासाठी सर्वच स्तरावर विविध पक्ष तयारी करत असतात. मात्र, पक्षाच्या प्रचारासाठी लहान मुलांचा उपयोग होणे हे धक्कादायक आहे. बिहारच्या मुंगेर लोकसभा मतदान संघात असेच एक चित्र पाहण्यास मिळाले.
या लोकसभा मतदार संघातून एनडीएचे उमेदवार चिराग पासवान निवडणूक लढवत आहेत. गुरुवारी मुंगेरमध्ये त्यांची जनसभा होती. त्या जनसभेत राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार हजर होते. त्यावेळी कडक उन्हात मोठ्या प्रमाणावर १० ते १२ वर्षाचे मुल सभास्थळी उभे होते. त्यांच्या हातात पक्षाचे झेंडे, डोक्यावर टोपी आणि गळ्यात पक्षाचा पट्टा घालून नितीश कुमारांच्या नावाच्या घोषणा देत होते. त्यांना ईटीव्ही भारतच्या पत्रकाराने झेंडा कोणी दिला असे विचारले असता त्यांनी धक्कादायक उत्तर दिले.
मुलांनी सांगितले की, शकुनी चौधरी यांनी त्यांना ५०-५० रुपये देऊन येथे बोलावून घेतले आहे. त्यांनीच आम्हाला झेंडे आणि या टोप्या दिल्यात. शकुनी चौधरी बिहारचे खासदार आणि आमदार राहिलेले आहेत. ते जनता दल युनाईटेडचे नेते आहेत.
या घटनेवरुन राजकारणातील नेते किती खालच्या स्तरावर जाऊन प्रचार करु शकतात याची प्रचिती येते. निवडणूकांच्या सभांमध्ये गर्दी दाखवण्यासाठी आयोजक गरीब मुलांना केवळ ५० रुपये देऊन बोलावून घेतात.