ठाणे - कल्याण पूर्वेत बँक ऑफ इंडियाच्या ( Bank of India ATM break in Thane ) एका खोलीतील दोन एटीएम फोडून २७ लाख रुपये ( Thieves break into ATM ) चोरट्यांनी लांबवले आहेत. चोर आपल्या सहकाऱ्यांना चोरीचे मार्गदर्शन करण्यासाठी हरियाणामधून विमानाने मुंबईत आले होते. अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. या प्रकरणातील दोन चोरांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणातील दोन चोरांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. सरफुद्दीन खान (रा. साकीनाका, अंधेरी), उमेश प्रजापती (रा. शीळफाटा) अशी चोरट्यांची नावे आहेत.
तंत्रज्ञ, कुशल चोरांची टोळी -पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील म्हसोबा चौकात कवठे सोसायटीच्या तळ मजल्याला बँक ऑफ इंडियाची दोन एटीएम आहे. रविवारी पहाटे २.४९ वाजता झालेल्या दरोड्यात या टोळीने बँक ऑफ इंडियाच्या दोन एटीएम फोडले. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर पांढरा रंग फवारुन कॅश बॉक्स सोबत नेण्यासाठी गॅस कटरचा वापर केला. यावेळी दोन्ही एटीएममधून २७ लाख ६७ हजार रुपयांची रक्कमेवर चोरट्यांनी डल्ला मारला. हीच पद्धत राज्यभरातील इतर दरोड्यांमध्ये चोरटे वापरत आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
दरोड्यांचा धडाका सुरू -या टोळीने सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील सांगली, सोलापूर, उस्मानाबाद येथून दरोड्यांचा धडाका सुरू केला होता. नंतर रायगड, सातारा, पुणे, ठाणे जिल्ह्यांकडे त्यांनी चोरी केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पेमेंट सर्व्हिसेस सिस्टीमचे तंत्रज्ञ सिध्दार्थ सूर्यवंशी यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला होता. चार चोर विमानाने हरियाणाला गेल्याचा शोध पोलिसांना लावला होता.
वेब लिंकच्या माध्यमातून चोरट्याचा एकमेकांशी संवाद -चोरटे मोबाईलवर बोलताना अन्य कोणत्या संभाषणात अडकू नये म्हणून वेब लिंकच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत होते. हे साधे चोर नसून ते तंत्रज्ञ कुशल असल्याने या चोरांचा पाठीराखा खूप मोठा असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केल्याचे सांगितले आहे.