पालघर - डहाणू येथील पारनाका येथे सकाळी भरधाव कारच्या धडकेत डहाणू नगरपरीषदेच्या 2 स्वच्छता कर्मचार्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपघातास कारणीभूत १६ वर्षीय अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले असून, कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात ( 2 Killed In Dahanu Accident ) घडल्याचे सांगितले जात आहे.
डहाणू- बोर्डी रस्त्यावरील वनविभागाच्या कार्यालयाजवळ डहाणू नगरपरीषदेचे 2 स्वच्छता कर्मचारी तुंबलेल्या गटाराची साफसफाई करत असताना पाऊस आल्याने भिंतीच्या आडोश्याला उभे असताना बोर्डी कडून येणार्या भरधाव कारने त्यांना चिरडून कार पुढे भिंतीवर जाऊन जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात डहाणू नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी भरत राऊत ( वय- 55 ) आणि वंकेश झोप ( वय- 38 ) या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. 16 वर्षीय कारचालक मुलगा हा बोर्डीकडून डहाणूकडे येताना कारवरील ताबा सुटल्याने हा भीषण अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या अपघातात कारचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून निष्काळजीपणे भरधाव कार चालवून 2 जणांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अल्पवयीन मुलास डहाणू पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर 2 स्वच्छता कर्मचार्यांच्या मृत्यूने संतप्त झालेल्या नागरिकांनी डहाणू पोलिस स्टेशन येथे मोठ्या संख्येने गर्दी केली होती.