राष्ट्रीय ज्युडो खेळाडूने केला जिम व्यावसाईकाचा खून नवी दिल्ली - प्रीत विहार परिसरात जिम व्यावसाईक महेंद्र अग्रवाल यांचा गोळ्या झाडून खून केल्यामुळे राजधानीत खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. जिम व्यावसायिकाचा खून त्याच्या माजी ट्रेनरनेच केला असून यात एका राष्ट्रीय ज्युडो खेळाडूचाही सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. रवी कुमार तोमर आणि इंद्रवर्धन शर्मा या दोन आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तर त्यांचा तिसरा साथिदार विजय अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यातील इंद्रवर्धन शर्मा हा राष्ट्रीय ज्युडोचा खेळाडू असल्याचेही पोलिसांनी यावेळी सांगितले.
जिम मालकाने लावला होता अपहरणाचा आरोप :माजी जिम ट्रेनर इंद्रवर्धन याच्यावर 2017 मध्ये जिम मालकाने अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे इंद्रवर्धनला तुरुंगाची हवा खावी लागली होती. त्याचा बदला घेण्यासाठी त्याने आपल्या साथिदारांसह हा खून केल्याचा खुलासा त्याने पोलिसांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलीस दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत आहेत.
अंदाधुंद गोळीबार करुन केला होता खून :प्रीत विहार परिसरात जिम व्यावसायिकाचा अंदाधुंद गोळीबार करुन खून करण्यात आल्याची माहिती विशेष पोलीस आयुक्त रवींद्र यादव यांनी दिली. 30 डिसेंबरला सायंकाळी साडेसातच्या सुमारास प्रीत विहार येथील एनर्जी जिमचे मालक महेंद्र अग्रवाल (36) यांचा मुखवटाधारी मारेकऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार करून खून केला होता. त्यामुळे परिसरात चांगलीच दहशत परसरली होती. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीस दलाने स्थानिक पोलीस, विशेष कर्मचारी आणि गुन्हे शाखेचे पथकाची नियुक्ती केली होती.
आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात :पोलीस उपायुक्त अमित गोयल यांनी सहायक पोलीस आयुक्त उमेश भरतवाल यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले होते. यात पोलीस निरीक्षक विवेक मलिक, निरीक्षक सम्राट कात्यान, उपनिरीक्षक मुकेश, हवालदार रामनरेश, घनश्याम, आशिष यांचा समावेश होता. यादरम्यान, खुनाची घटना घडवून आणणारे आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक विवेक मलिक यांच्या पथकाला मिळाली होती. त्यामुळेपोलीस पथकाने तात्काळ सापळा रचून दोन्ही मारेकऱ्यांना भारत-नेपाळ सीमेवरील रक्सौल येथून अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पैशांच्या देवाण घेवाणीवरुन झाला होता वाद :इंद्रवर्धनने महेंद्र अग्रवाल यांच्यासोबत दीर्घकाळ काम केले होते. त्यांने व्यवसायात 4.75 लाख रुपये गुंतवले होते. मात्र महेंद्रने पगार आणि त्याची रक्कम परत केली नाही. इंद्रवर्धनने 2017 मध्ये पुन्हा पैसे मागतल्याने दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे महेंद्रने आपले अपहरण केल्याचा आरोप इंद्रवर्धनवर केला. त्यानंतर प्रीत विहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात इंद्रवर्धनला तुरुंगात जावे लागले. मुलगा तरुंगाता गेल्यामुळे इंद्रवर्धनच्या आईला प्रचंड वेदना झाल्या. त्यामुळे इंद्रवर्धनने याचा बदला घेत महेंद्रला मारण्याचा कट रचल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
असा केला खून :इंदरवर्धनने आधी शस्त्रांची व्यवस्था केली. त्यानंतर त्याचे मित्र रवी आणि विजय यांच्याशी खून कसा करायचा याबाबत चर्चा केली. त्यानंतर घटनेच्या दिवशी विजयने दोघांनाही कारमधून प्रीत विहार येथील जिममध्ये आणले. यावेळी इंद्रवर्धन आणि रवी जिमच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या कार्यालयात गेले. त्यांनी अंदाधुंद गोळीबार करून महेंद्र अग्रवाल यांचा खून केला. तर बाहेर थांबलेल्या विजयने त्यांना गाडीत बसवून ते फरार झाले. हे मारेकरी यूपी आणि उत्तराखंडमध्ये लपून बसले होते. त्यानंतर तेथूनच त्यांचा नेपाळला पळून जाण्याची बेत होता. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा - Beed Crime : केजच्या नायब तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला; भररस्त्यात पेटविण्याचा प्रयत्न