नांदेड :नांदेडमधील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्या प्रकरणातील 9 आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना सोमवारी (ता. 13) न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींवर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश एस. ई. बांगर यांनी या 9 आरोपींना मोक्का कायद्याअंतर्गत सात दिवस 20 जूनपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणाचा तपास बिलोली पोलीस उपविभागाचे सहायक पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याकडे देण्यात आला आहे.
पोलीस कोठडी संपल्याने न्यायालयात हजर : बांधकाम व्यावसायिक बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांची 5 एप्रिल रोजी त्यांच्या शारदानगर येथील घरासमोर, दुचाकीवरील दोघांनी गोळ्या झाडून हत्या केली. हत्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी विविध राज्यांतून 11 आरोपींना अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेली व आरोपींनी जाळून टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेली पल्सर दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. सुरुवातीला अटक केलेले 9 आरोपी 13 जूनपर्यंत पोलिस कोठडीत होते. त्यांची पोलिस कोठडी संपल्याने 9 आरोपींना सोमवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले.