उस्मानाबाद : ज्यादा दराने धान्य खरेदी करतो असे आमिष दाखवून शेकडो शेतकऱ्यांचे 3 कोटी 41 लाख 42 हजार रुपयांचे धान्य खरेदी करून शेतकऱ्यांचे पैसे न देता फरार झालेला मुख्य आरोपी, संतोष रानमोडे यास बुलढाणा पोलीस पथकाने परंडा पोलिसांच्या मदतीने बावची तालुका परंडा येथून अटक (Arrested from Taluka Paranda) केले आहे. परंडा तालुक्यातील मुख्य आरोपी संतोष रानमोडे यास अटक करून त्याने उकिरड्यात पुरलेली 42 लाख 11 हजार रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केले आहे.
यावेळी बुलढाणा पोलीसांनी (Buldhana Police) दिलेली माहिती अशी की, मुख्य आरोपी संतोष बाबुराव रानमोडे हा परंडा तालुक्यातील कौडगाव येथील मूळ रहिवासी आहे. शेतकरी फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष रानमोडे याचे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे पवित्रा ट्रेडिंग कंपनी नावाने धान्य खरेदी आडत दुकान होते.आरोपी संतोष रानमोडे याने अशोक समाधान मस्के, निलेश आत्माराम सावळे यांच्या मदतीने चिखली परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना जादा दराने धान्य खरेदी करतो असे आमिष दाखवून शेतमाल खरेदी केला. व तुमच्या खात्यावर ऑनलाईन पैसे पाठवतो अशी थाप शेतकऱ्यांना मारली. मात्र शेतकऱ्यांना पैसे न देता घेतलेला माल विकुन तिघे आरोपी फरार झाले होते. शेतमाल विक्री केलेले पैसे खात्यावर न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात येताच पवित्रा ट्रेनिंग कंपनीच्या धान्य खरेदी आडत दुकानदाराच्या विरोधात शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी सुनील लक्ष्मणराव मोडेकर यांनी चिखली पोलिसात फिर्याद दिल्याने मुख्य आरोपी संतोष रानमोडे, अशोक समाधान मस्के, निलेश सावळे,
यांच्यावर फसवणुकीसह विविध कलमानुसार चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) गुन्हा नोंद करण्यात आला होता.