नवी दिल्ली/गाझियाबाद:गाझियाबादच्या साहिबााबाद पोलिस स्टेशन परिसरात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पाच वर्षांच्या निष्पाप मुलीचे अपहरण करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला गाझियाबाद पॉक्सो कोर्टाने शुक्रवारी दोषी ठरवले. आरोपीला शिक्षेची तारीख 4 फेब्रुवारी निश्चित करण्यात आली होती. विशेष सरकारी वकील संजीव बखरवा यांनी सांगितले की, न्यायालयाने आरोपी असलेल्या सोनूला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात एकूण 15 साक्षीदार न्यायालयात हजर झाले, ज्यात दररोज सुनावणी झाली. अशाप्रकारे न्यायालयाने या खटल्यात 64 दिवसांत शिक्षा सुनावली आहे.
मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर होत्या गंभीर जखमा :हे प्रकरण गाझियाबादच्या साहिबाबाद पोलीस स्टेशन क्षेत्राशी संबंधित आहे. 1 डिसेंबर रोजी येथून 5 वर्षांची मुलगी बेपत्ता झाली, त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचा खूप शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. 2 डिसेंबर रोजी जवळच्या जंगलात शोध घेत असताना मुलीचा मृतदेह सापडला होता. तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असता धक्कादायक बाबी समोर आल्या. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर गंभीर जखमा होत्या. तिच्यासोबत बलात्काराची ही घृणास्पद घटना घडल्याचे उघड झाले होते.
आरोपी अनेक दिवसांपासून करत होता पाठलाग :चौकशीत आरोपीने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याने सांगितले की, तो रोज एका शाळकरी मुलीला फॉलो करत असे. 1 डिसेंबरलाही तो एका विद्यार्थिनीच्या मागे सिटी फॉरेस्टजवळील कॉलनीच्या दिशेने जात असताना तो तिला टार्गेट करू शकला नाही. यानंतर त्याने कॉलनीत खेळणाऱ्या पाच वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यासोबत बलात्काराची ही घृणास्पद घटना केली.