पणजी - राज्यात आर्थिक घडामोडी आता सुरू झाल्या आहेत. लॉकडाऊन केले तर सर्वच कोलमडून जाईल. हे टाळण्यासाठी आणि कोविड -19 चे संक्रमण रोखण्यासाठी जनतेने मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पणजीत केले. ते अग्निशमन दलाच्या राष्ट्रीय अग्नीशमन सेवा दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
अग्नीशमन दलाच्या वतीने राष्ट्रीय अग्निशामक सेवा दिनाच्या निमित्ताने सांतिनेज येथील मुख्यालयात संचालनाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याहस्ते शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर त्यांनी संचालनाची पाहणी केली. सेवेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अनेक जवानांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यानिमित्ताने आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. यावेळी अग्नीशमन आणि आपत्कालीन संचालनालयाचे संचालक अशोक मेनन, गोव्याचे मुख्यसचिव परिमल राय, पणजीचे महापौर रोहीत मोन्सेरात आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी मागील काळात अग्निशामक दल आणि जवानांनी दिलेल्या सेवेबद्दल अभिनंदन करताना ते म्हणाले, अग्निशामक दलासाठी ज्याठिकाणी आवश्यक आहे, तेथे आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. यासाठी पुढील सहा महिन्यांत होमगार्डच्या धर्तीवर 'फायरगार्ड' भरती केले जाणार आहेत. यासाठी अशाप्रकारचे कौशल्य असलेल्या गोमंतकीयांनी पुढे यावे, असे आवाहानही त्यांनी केले. लॉकडाऊन, नाइट कर्फ्युचा विचार नाही. कोविड-19 रोखण्यासाठी लोकांचे सहकार्य आवश्यक आहे, असे सांगत डॉ. सावंत म्हणाले, ज्यांना याविषयीची लक्षणे दिसून येतात, त्यांनी स्वतः चाचणी करून घ्यावी. सर्व आरोग्य केंद्रात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोविड-19 ची भयानकता पाहून आपल्या शेजारील राज्यात लॉकडाऊन करण्यात आले, तशी स्थीती येऊ द्यायची नसेल तर लोकांनी हात धुणे, शारीरिक अंतर पाळणे, सॅनिटायझर आणि मास्क यांचा वापर केला पाहिजे. तसेच अनावश्यक गर्दीत जाणे टाळले पाहिजे.