महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

100 नंबरला कॉल करणाऱ्या तरुणाला पोलिसाकडून बेदम मारहाण - पोलिसांची तरुणाला मारहाण

100 नंबरला कॉल करणाऱ्या तरुणाला पोलिसाकडून बेदम मारहाण झाल्याचे समोर आले आहे. दिपक वाघमारे असे पोलिसांकडून बेदम मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे.

young-man-who-called-the-100-number-was-beaten-to-death-by-police
100 नंबरला कॉल करणाऱ्या तरुणाला पोलिसाकडून बेदम मारहाण

By

Published : Apr 1, 2021, 8:35 PM IST

Updated : Apr 23, 2021, 1:08 PM IST

ठाणे -100 नंबर हा जनतेच्या मदतीकरता असतो हे सर्वश्रुत आहे. पोलीस प्रशासनाने या नंबरची व्यवस्था अडीअडचणी सापडलेला नागरिकांना मदतीसाठी केली असताना एका तरुणाला मात्र या नंबरचा अत्यंत वाईट अनुभव आला. 100 नंबर वर कॉल करून मदतीची याचना करणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी चक्क बेदम झोडपून काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिपक वाघमारे असे पोलिसांकडून बेदम मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे.

100 नंबरला कॉल करणाऱ्या तरुणाला पोलिसाकडून बेदम मारहाण

पत्नी जीवाचे बरे वाईट करेल म्हणून केला होता कॉल -

दिपक वाघमारे हा पत्नीसोबत कल्याण पूर्वेतील हाजी मलंग रोड वर असलेल्या एका इमारतीमध्ये राहतो. घटनेच्या दिवशी पती पत्नी मध्ये काही कारणावरून भांडण झाले होते. भांडण झाल्यानंतर आपली पत्नी जिवाचे काही बरे वाईट करुन घेईन या भीतीने घाबरलेल्या पतीने पोलीस कंट्रोल मधील 100 नंबरला संपर्क साधत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. 100 नंबर वर पोलीस नियंत्रण कक्ष कल्याणला कॉल करून घडलेला प्रकार सांगत पोलिसांची तातडीने मदत मागितली. पोलीस नियंत्रण कक्ष नेहमीप्रमाणे मानपाडा पोलीस ठाण्यात माहिती देऊन घटनेच्या ठिकाणी जाण्यास स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले. मात्र, मानपाडा पोलिस वेळेत पोहोचले नसल्याने दिपक वाघमारे यांनी पुन्हा कॉल करून मदत मागितली. त्यानंतर मानपाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि वैतागलेल्या पोलिसांनी दीपक वाघमारे यांना जबरदस्तीने सोबत आणलेल्या व्हॅनमध्ये बसण्यास सांगितले. दिपक वाघमारेंनी व्हॅनमध्ये बसण्यास नकार दिला. तुम्ही दारू पिऊन आल्या आहात असे दीपक पोलिसांना बोलला, तुम्ही जा मी पुढे येतो असे सांगून दिपक मानपाडा पोलीस ठाण्याच्या दिशेने निघाला. त्यानंतर पाठीमागून आलेल्या पोलिसांनी थांबून दिपक वाघमारे यांना काठीने रस्त्यातच बेदम मारहाण केल्याचे त्याने सांगितले.

घडलेली घटना दाबण्याचा पोलिसांचा प्रयत्न -

बेदम महाराणीचा प्रकार घडल्यानंतर जखमी अवस्थेत दीपक मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चौरे यांच्या कडे जाऊन त्याने घटनेची माहिती दिली. मात्र, वरिष्ठांनी या गंभीर घटनेची दखल न घेता पोलिसांना माफी मागायला लावतो असे सांगून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिपकने मारहाण करणाऱ्या पोलिसांवर विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी केली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक चौरे यांनी दिपकला पोलिस ठाण्यातून पिटाळून लावले. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत दिपक वाघमारे हा तरुण जखमी झाला असून त्याला कल्याण मधील रुक्मिणी बाई रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याला झालेल्या मारहाणीमुळे त्याच्या मांड्या व पोटऱ्या सोलवटून काढल्याने त्याला नीट चालता येत नाही. आता मदत करण्याऐवजी आपल्याला मारहाण करणाऱ्या संबंधित पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी करत त्याने पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्याकडे मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्या विरोधात लेखी तक्रार अर्ज दिला आहे. आता वरिष्ठ अधिकारी पोलिसांवर काय कारवाई करतात याकडे वाघमारे कुटुंबियांच्या नजर लागली आहे.

Last Updated : Apr 23, 2021, 1:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details