मुंबई - 23 हा ऑगस्ट जागतिक वडापाव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मुंबई आणि वडापाव हे नातं वेगळेच आहे. वडापावने मुंबईतील अनेकांना तारले आहे. या वडापावच्या गाडीवर अनेक कुटुंबाचे गाडे चालतात. वडापावच्या जिवावर अनेकांनी मोठी संपत्ती देखील कमावली आहे. याबाबत ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट.....
मुंबईत हजारोंनी वडापावच्या गाड्या आहेत. काही वडापाव हे त्या भागात प्रसिद्ध आहेत. तर काही वडापाव मुंबईत प्रसिद्ध आहेत. दुकान कोणते टाकायचं आज जर विचार केला तर पहिल्यांदा वडापावचं येतं, असं नातं मुंबईकरांसाठी वडापावचे आहे. प्रभादेवी येथील वीस वर्षापूर्वी सुरू केलेला सारंग बंधूंचा वडापावचा व्यवसाय आता फुललेला आहे. त्याच जोरावर त्याने दुसरे कोकणी हॉटेल सुरू केलेले आहे. मराठी माणसाने काही तरी उद्योग करावा यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वडापाव व्यवसाय सुरू करा, असे सांगितले. बाळासाहेबांनी हाक दिली तसा आम्ही वडापावचा व्यवसाय सुरू केला. पंधरा पैशापासून वडापाव विकायला सुरुवात केली होती. आज याच व्यवसायाने आम्हाला एक नवी ओळख दिलेली आहे. प्रभादेवीमध्ये सारंग बंधू म्हणून आम्ही प्रसिद्ध आहोत. आज आमची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. असे सारंग बंधूचे सुभाष सारंग यांनी सांगितले. कशी सुरू झाली वडापावची सुरवात
दादर स्टेशनजवळच्या एका चाळीमध्ये राहणाऱ्या अशोक वैद्य यांनी आपलं वडे आणि पोहे विकण्याचं दुकान १९६०च्या दरम्यान सुरु केलं. आसपासच्या दुकानातही असेच काही खाण्याचे पदार्थ मिळत होते. १९६६ च्या दरम्यान अशोक वैद्य यांना एक आयडिया सुचली. ही आयडिया एकदम साधी सोप्पी होती. एका पाव आणि त्याच्या मध्यभागी बटाट्यापासून तयार केलेल्या वड्याला ठेवायचं, एवढंच !! बटाटा आणि वडा यांची ही जोडी काहीच दिवसात एवढी गाजली की इतरांनी त्याची कॉपी करायला सुरुवात केली. इथूनच मुंबईत वडापावचा जन्म झाला, असे बोलले जाते.
मुंबईतील आणखी प्रसिद्ध वडापाव
श्रीकृष्ण वडापाव
दादर येथील श्रीकृष्ण वडापावचा वडा हा इतर ठिकाणी मिळणाऱ्या वड्यांच्या तुलनेत खूपच मोठा असतो. साधारण एक वडापाव खाल्ल्यानंतर तुमचं पोट नक्कीच भरतं. या वड्याच्या भाजीची चव वेगळी असल्यामुळेच हा वडापाव मुंबईमध्ये प्रसिद्ध आहे. शिवाय याठिकाणी वडापावला सतत मागणी असल्यामुळे तुम्हाला नेहमी फ्रेश आणि गरम वडापावच मिळतात.
कुंजविहार वडापाव
७० वर्षांपासून ठाण्यातील लोकप्रिय वडापावच्या यादीत कुंजविहारचा वडा हा प्रथम स्थानी आहे. वड्यात जपलेली पारंपारिकता त्याची चव आणि दर्जा टिकवण्यासाठी घेतलेली मेहनत या सगळ्यांमुेळे ठाण्याचा कुंजविहार वडापाव फेमस आहे. वड्याचा आकार मोठा असल्यानं पोट भरतं आणि मन तृप्त होतं.
ग्रॅज्युएट वडापाव
पहिलं तर ज्याला हे नाव सुचलं त्याला २१ तोफांची सलामी. नेमकं याचं नाव ग्रॅज्युएट वडापाव का बरं ठेवलं असेल? असा प्रश्न पडला आहे. असो... भायखळा स्थानकाच्या पूर्वेला हे दुकान आहे. इथला वडापाव अव्वल दर्जाचा असून गेल्या १७ वर्षांपासून इथं वडापाव विक्री होते.
आराम वडापाव
दक्षिण मुंबईतलं सीएसटी, मुंबई महापालिकेच्या समोरचं हे प्राईम लोकेशन. ८ ऑगस्ट १९३९ मध्ये म्हणजे अगदी इंग्रजांच्या काळात भाऊ उर्फ श्रीरंग तांबे या मराठी माणसानं हॉटेल सुरू केलं. आरामचा वडापाव तुम्हाला चीझ, बटर ग्रिल्ड पावसोबत किंवा नुसताही मिळतो. या वड्याची भाजी पांढऱ्या रंगाची असते. तांबे कुटुंबाची तिसरी पिढी हा व्यवसाय सांभाळते. मात्र वड्याच्या चवीत तसुभरही फरक पडलेला नाही.
गजानन वडापाव
ठाण्यात तुम्ही या वडापावचा आस्वाद घेऊ शकता. इथल्या वडापावपेक्षा त्याची पिवळी चटणी जास्त हिट आहे. इथं वडापावसोबत सुक्या खोबऱ्याची लाल चटणी किंवा ओल्या खोबऱ्याची पांढरी चटणी मिळत नाही. तर बेसनपासून तयार केलेली एक आगळीवेगळी पिवळी चटणी मिळते. ही चटणीच गजानन वडापावची शान आहे.
बोरकर वडापाव
गिरगावच्या बोरकर वडापावची ख्याती सगळीकडे पसरली आहे. गिरगाव चौपाटीवर बोरकर वडापावची ब्रांच आहे. इथल्या चटणीला अधिक पसंती दिली जाते. चटणीमुळे वडापावच्या चवीत आणखी भर पडते. गिरगावच्या पै हॉस्पिटलजवळ बोरकर वडापाव सेंटर आहे.
पार्लेश्वर वडापाव
विलेपार्लेमध्ये पार्लेश्वर मंदिराजवळ मिळणारा हा वडापाव प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तुम्हाला वडापाव खाण्यासाठी नेहमीच गर्दी दिसून येते. इथे वडापावची विविध व्हरायटी तुम्हाला मिळते. बटर, चीज इत्यादीसह या ठिकाणी वडापाव मिळतो. अगदी रेग्युलर वडापावपासून ते वेगवेगळ्या वडापावसाठी इथे लोक चव चाखायला येतात.
कीर्तीचा वडापाव
खरं तर अशोक वडापाव हा किर्ती कॉलेजजवळील वडापाव याच नावाने प्रसिद्ध आहे. याची स्पेशालिटी म्हणजे तुम्हाला वडापावबरोबरच भरभरून बेसनचा चुराही देण्यात येतो, जो चवीला अप्रतिम लागतो. वेगवेगळ्या चटणींबरोबर मिळणारा हा चविष्ट वडापाव कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्येच नाही तर अगदी संपूर्ण मुंबईत प्रसिद्ध आहे.
हेही वाचा -जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी महाराष्ट्रनंतर बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट