ठाणे - काल्हेर येथे शिवसेनेच्या शाखा प्रमुखावर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच एका महिलेच्या घरात घुसून महिलेवर गोळीबार झाल्याची दुसरी घटना काल्हेर येथील एका निवासी सोसायटीमध्ये मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. या जखमी महिलेवर खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. जयश्री देढे (वय ३७) असे जखमी महिलेचे नाव असून काल्हेर मधील जय दुर्गा सोसायटीमध्ये आपल्या परिवारासह राहत आहेत.
भिवंडीतील काल्हेर गावात झालेल्या गोळीबारात महिला गंभीर - thane news today
एका दुचाकीवरून आलेल्या दोघा शूटर्सनी महिलेच्या दिशेने गोळीबार केला. यात महिला गंभीर जखमी असून तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा भिवंडी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
ट्रान्सपोर्टचा व्यवसाय
जयश्री देढे महिलेच्या पतीचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय असून जखमी महिलादेखील ट्रान्सपोर्ट व्यवसाय सांभाळत आहे. मंगळवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास पती कामानिमित्त तर मुलगा मित्रांकडे गेले असता महिला घरात दुपारच्या सुमारास एकटीच होती. यावेळी दोन अज्ञात इसम रिक्षाने आले व त्यांनी घरात घुसून महिलेशी वाद विवाद करत या महिलेवर गोळीबार केला. या गोळीबारात महिला गंभीर जखमी असून तिच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल्हेरमधील गोळीबाराची ही दुसरी घटना असून अधिक पोलीस तपास सुरू आहे. या गोळीबारामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान भरदिवसा घडलेल्या या गोळीबाराने परिसरात एकच दहशत निर्माण झाली आहे.