ठाणे -हॉटेल मालकाने एका महिला शासकीय अधिकारीशी ओळख वाढवित तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना टिटवाळा परिसरात घडली आहे. या प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात (रविवारी) रात्री उशिरा बलात्कारासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करीत पोलिसांनी हॉटेल मालकाला अटक केली आहे. संपत शिरसाट, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा -आमदार मिटकरींच्या 'त्या' वक्तव्याविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार
पीडितेकडून मोबाईल नंबर मिळवा -आरोपी संपत शिरसाट उर्फ बुवा हा टिटवाळा परिसरात हॉटेल चालवीत असून, तो त्याच भागातील एका सोसायटीत राहतो. गेल्या वर्षी पीडित महिला अधिकारी दुपारच्या सुमारास आरोपीच्या हॉटेलमध्ये जेवायला गेली होती. त्यावेळेस या पीडित महिला अधिकाऱ्याला तुमचा ऑफिस स्टाफ देखील माझ्या हॉटेलमध्ये जेवायला येत असल्याची माहिती देऊन आरोपीने पीडितेकडून मोबाईल नंबर मिळवला. त्यानंतर मोबाईलवर महिनाभर संपर्क करून पीडितेचा विश्वास संपादन केला. त्याच वेळी पीडित महिला अधिकारी शासकीय कामकाज आटोपून नेहमी जेवणाकरिता हॉटेलमध्ये जात होती. त्यामुळे दोघांची ओळख होऊन मैत्री निर्माण झाली होती.
वाढ दिवसाच्या बाहान्याने अत्याचार -१५ जुलै २०२० रोजी आरोपीचा वाढदिवस असल्याने रात्रीच्या वेळी बहाण्याने पीडितेच्या घरी जाऊन तिला लग्नाचे आमिष दाखवीत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. खळबळजनक बाब म्हणजे, आरोपी संपत उर्फ बुवा याचा विवाह झाला असून त्याला दोन मुले असल्याची माहिती पीडित महिला अधिकारीला मिळाल्याने तिने त्याच्याशी असलेले संबंध तोडले होते.
पीडितेचा अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी - आरोपीने पीडितेबरोबर शारीरिक संबंधांचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. शिवाय गाळा घेण्यासाठी लाखो रुपयांची मागणीही आरोपी पीडितेला करीत होता. मात्र, पीडितेने पैसे न दिल्याने तिला चामडी पट्ट्याने मारहाण करत तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला.
आरोपीची रवानगी पोलीस कोठडीत -पीडित महिला अधिकारीने आरोपीकडून सुरू असलेल्या छळास कंटाळून अखेर कल्याण तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिच्यावर झालेला प्रसंग कथन करताच पोलिसांनी विविध कलामांसह आरोपी विरोधात बलात्कार, तसेच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहे. आरोपीला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राम भालसिंग करीत आहेत.
हेही वाचा -Thane Traffic Police : वाहतुकीचे नियम मोडले तर, जनजागृती करा अन्यथा फाईन भरा.. वाहतूक शाखेचा अनोखा उपक्रम