ठाणे - गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक चांगलेच चर्चेत आहेत. टॉप्स सिक्युरिटी घोटाळ्यात ईडी मागे लागली आणि सरनाईक कोण आहेत याबाबत चर्चा सुरू झाली.रिक्षाचालक, नगरसेवक, व्यावसायिक आणि आमदार असा खडतर प्रवास करणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेकवेळा इतिहास घडविले आहेत. दरम्यान प्रताप सरनाईक यांनी परवा टाकलेल्या लेटरबॉम्बने महाविकास आघाडीसह राज्यात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अचानक दिल्लीत आले आहेत.
कोण आहेत प्रताप सरनाईक..
प्रताप सरनाईक यांचा जन्म वर्धा जिल्ह्यात झाला. बालपणीच वर्धा जिल्ह्यातून मुंबईला स्थायिक झाले. त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. डोंबिवलीच्या एस. व्ही. जोशी शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी काही काळ रिक्षा चालवली. १९९७ साली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सदस्यत्व घेऊन राजकारणात उडी मारली. १९९७ मध्ये ठाणे महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. २००८ मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला. २००९ मध्ये ते आमदार झाले. ओवळा माजिवाडा मतदारसंघातून ते तिनदा आमदारपदी निवडून आले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात त्यांनी १२५ कोटी रुपयांची एकूण मालमत्ता दाखवली होती.
योग्यवेळी व्यवसायांतर..अन् योग्यवेळी पक्षांतर..
राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सरनाईकांची राजकीय वाटचाल सुरू झाली. त्याच दरम्यान पवार साहेबांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीत भरारीच्या त्वेषात असलेले आजचे राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची राजकारणाच्या प्रवासात काही काळ साथ लाभली. अल्पवधीतच ठाण्याच्या सावरकरनगर परिसरातून प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर पालिकेची पहिली निवडणूक लढविली आणि विजयी ही झाले. त्यानंतर राष्ट्रवादीत घुसमट होत असल्याने त्यांनी २००८ साली राष्ट्रवादीला रामराम तिकीट शिवसेनेत प्रवेश केला. २००८ साली शिवसेनेत आलेल्या प्रताप सरनाईक यांनी आपले लागेबांधे यांचा वापर करून अवघ्या एका वर्षातच २००९ साली विधानसभा निवडणुकीचे तिकीट पदरात पडून घेतले. त्यानंतर प्रताप सरनाईक हे शिवसेना आमदार झाले. त्यानंतर सलग तिसऱ्यांदा आजपावेतो ते शिवसेना आमदार आहेत. एकेकाळचा रिक्षा चालक आज १२५ कोटींचा मालक झाला आहे. त्यांचे हे यश पाहून राजकारणाच्या जादूची छडी त्यांच्या हाती लागलेली असावी, अशा चर्चा जनमानसात रंगतात.
प्रवक्ते पदानंतर केंद्र सरकारला अंगावर घेणे पडले महागात..
शिवसेनेत एक आक्रमक नेता म्हणून आपले बस्तान प्रताप सरनाईक यांनी बसविले. सलग तिसऱ्यांदा शिवसेनेचे आमदार म्हणून सातत्याने कार्यरत असल्याने शिवसेना पक्षनेते झाले. त्यांना शिवसेनेत प्रवक्ते पद मिळाले नांतर त्यांनी भाजपला अंगावर घेणे सुरू केले. भाजपच्या नेत्यांच्या कानटोचण्या, आव्हाने, प्रति आव्हाने सुरू झाली आणि प्रताप सरनाईक हे भाजपच्या सुडाच्या राजकारणाच्या यादीवर आले. कारभार कितीही पारदर्शक असो अनियमितता राहतेच अन् तेच पकडून भाजपने प्रताप सरनाईक यांना लेटरबॉम्ब टाकण्याच्या स्थितीवर आणले. ठाण्याच्या वर्तकनगर भागात "शिवसेना आमदार हरविले" अशा आशयाचे फलक याशिवाय पोलीस ठाण्यासमोर 'शिवसेनेच्या गायब आमदारांना शोधा', असे फलक घेऊन भाजपाकडून आंदोलन केले जात आहे, त्यामुळे हे सुडाचे राजकारण असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
दोन्ही मुले विहंग आणि पूर्वेश राजकारणात
प्रताप सरनाईकांना दोन मुलं आहेत. यांच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव विहंग तर धाकट्या मुलाचे नाव पूर्वेश आहे. दोघेही युवासेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांचे जवळचे संबंधत आहेत. पूर्वेश सरनाईक हे युवासेनेचे सचिव आहेत. तर युवासेनेच्या कामांमध्ये ते सक्रियपणे सहभागी होतात. तर पूर्वेश यांच्या पत्नी परिशा सरनाईक या ठाणे महानगरपालिकेत नगरसेविका आहेत. विहंग शांतिवन, विहंग गार्डन, सृष्टी कॉम्प्लेक्स, विहंग रेसिडेन्सी, विहंग टॉवर, विहंग पार्क, रौनक टॉवर, विहंग आर्केड आणि रौनक आर्केड असे अनेक रहिवासी प्रकल्प विहंग ग्रुपच्या माध्यमातून ठाणे शहरात उभारण्यात आले आहेत. ठाण्याच्या घोडबंदर रोडला मानपाड्याजवळ विहंग्ज इन हे थ्री-स्टार हॉटेलही आहे.
इथे आले अडचणीत..
रिक्षा चालक ते शिवसेना नेते या दरम्यान हिशोबी १२५ कोटीची मालमत्ता, त्यातच बांधकाम व्यवसायातही वाटचाल म्हणजे चांगभलेच समजले जाते. कारण बांधकाम व्यवसायिकतेमध्ये झटपट पैसा हे समीकरण असते. हेच समीकरण सरनाईकांना अडचणीचे ठरले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी जमिनी खरेदी-विक्रीत घोळ केल्याचा आणि टॉप्स सिक्युरिटीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप त्यांचावर झाला आणि त्यात ईडी मागे लागली. भाजप नेत्यांनी केलेल्या आरोपांमुळे टॉप्स सिक्युरिटी गैर व्यवहार प्रकरण त्यांच्या अंगलट आले. त्यांच्या कार्यालय आणि घरावर ईडीने छापे मारले तो ईडीचा ससेमिरा आजही त्यांच्या मागे आहे. याला कंटाळूनच अखेर प्रताप सरनाईक यांनी लेटर बॉम्ब टाकला.
केंद्रातील भाजप नेत्यांशी दिलजमाई करा, जुळवून घ्या अन्यथा आमच्या सारख्यांच्या बळी जातो, अशा आशयाचे लेटर बॉम्ब सरनाईकांनी टाकल्याने मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीने याची दाखल घेतली. परिणामी शरद पवार अचानक थेट दिल्लीत आले. आता हे प्रकरण पुढे काय वळण घेतलंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.