ठाणे - कोरोना प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या टाळेबंदीचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. आता कोरोनाच्या काळात लग्न सोहळे रद्द झाल्याने आणि मर्यादित वऱ्हाडी उपस्थित राहण्याच्या र्निबधांमुळे यंदा लग्नपत्रिका छपाईत घट झाली आहे. यापूर्वी तीनशेहून अधिक लग्नपत्रिका छपाईची ऑर्डर दिल्या जात होत्या. मात्र, आता केवळ 30 ते 40 पत्रिका छपाईची ऑर्डर दिली जात आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी राज्य शासनाने काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच लग्न कार्यक्रम साजरे करण्यावर र्निबंध आले आहेत. यामुळे पूर्वीसारखे मोठय़ा प्रमाणात कार्यक्रम होत नसल्यामुळे त्याच्याशी संबंधित अनेक व्यवसाय आर्थिक संकटात सापडले आहेत.
लग्न सोहळ्यावर विविध व्यवसाय अवलंबून असून सध्या लग्न सोहळा साध्या पद्धतीने होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केवळ 20 जणांच्या उपस्थितीत लग्न सोहळा करण्यास राज्य शासनाने सुरुवातीला परवानगी दिली होती. त्यामुळे अनेकांनी लग्न सोहळे रद्द करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा फटका लग्न सोहळ्यावर अवलंबून असलेल्या पत्रिका छपाई, सभागृह, मंडप, विद्युत रोषणाई, ध्वनिक्षेपक अशा सर्वच व्यवसायांना बसला.
30 ते 40 लग्नपत्रिका छपाईची ऑर्डर -