वसई - बुधवारी सकाळपासून वसईत अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. पाऊस सुरू असतानाही भर पावसात पालिकेच्या उद्यान विभागाकडून वसंत नगरी येथे झाडांना पाणी दिले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे वसई विरार महापालिकेचा अजब कारभार सुरू असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.
वसई-विरार पालिकेचा अजब कारभार : उद्यान विभागाकडून भर पावसात झाडांना पाणी - वसंत नगर उद्यान
पाऊस सुरू असताना झाडांना पाणी देणे गरजेचे नाही असे असतानाही झाडांना पाणी देण्याचा प्रकार अतिशय मूर्खपणाचा असून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी असे उपद्वाप केले जात आहे. जनतेच्या करांचा पैसा अशाप्रकारे पाण्यात घालविला जात असल्याचेही नागरिकांनी सांगितले आहे.
वसई विरार महापालिकेने रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकांच्यामध्ये शोभेची झाडे लावली आहेत. या झाडांच्या देखभालीचे काम हे पालिकेच्या उद्यान विभागाकडून केले जाते. यासाठी त्यांनी ठेकेदारही नेमले आहेत. पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने बुधवारी वसई विरारमध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात झाली होती. दिवसभर पाऊस सुरूच होता. पावसात शहरातील रस्ते, झाडे-पाने सर्वकाही ओलेचिंब झाले होते. अशातच पालिकेच्या उद्यान विभागाकडून वसंत नगरी येथील भागात झाडांना टॅंकरद्वारे पाणी देण्याचे काम सुरू असल्याचे चित्र दिसून आहे. पाऊस सुरू असतानाही पालिकेकडून झाडांना पाणी दिले जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच टँकरद्वारे कर्मचारी झाडांना पाणी देत असल्याची चित्रफीत ही चांगलीच समाजमाध्यमावर सर्वत्र फिरत आहे.
पाऊस सुरू असताना झाडांना पाणी देणे गरजेचे नाही असे असतानाही झाडांना पाणी देण्याचा प्रकार अतिशय मूर्खपणाचा असून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी असे उपद्वाप केले जात आहे. जनतेच्या करांचा पैसा अशाप्रकारे पाण्यात घालविला जात असल्याचेही नागरिकांनी सांगितले आहे. जेव्हा गरज असते तेव्हा मात्र पाणी दिले जात नाही. तेव्हा ही झाडे सुकून जातात. तरीही लक्ष दिले जात नाही, असेही नागरिकांनी सांगितले आहे. याबाबत पालिकेकडे विचारणा केली असता अँस्थेटिक लँण्डस्केपींग या ठेकेदाराला वसंत नगरी, एव्हरशाईन जवळील दैनंदिन देखभालीचे काम देण्यात आले आहे. बुधवारी दुपारी तीन-सव्वा तीनच्या सुमारास पाऊस सुरू असतानाही कर्मचाऱ्यांनी पाणी दिल्याचा प्रकार समजले आहे. संबंधित ठेकेदाराला पालिकेने नोटीस काढून चौकशी केली जात असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.