ठाणे : कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाजीपाल्याचे दर घसरले आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील हजारो हॉटेलचे शटर डाऊन असल्याने हॉटेलमध्ये लागणारा रोजचा भाजीपाला बाजार समितीत येणे सुरूच असल्याने भाजीपाल्याचे दर घसरल्याचे बोलले जात आहे.
भाजीपाल्याची आवक वाढल्याने दर घसरले संचारबंदी लागू असली तरी नागरिकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी शासकीय यंत्रणांनी घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मात्र कृषीमाल व्यापार करणाऱ्या व्यापारी, शेतकरी यांना पोलीस त्रास देत असल्याच्या तक्रारी मोठ्याप्रमाणात येत असल्याने कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी डीसीपी विवेक पानसरे यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. यावर डीसीपी पानसरे यांनी शेतकरी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही अशी हमी दिली. शिवाय गुढी पाडवा सणाच्या दिवशी कल्याण बाजार समितीत भाजीपाल्याची अवाक वाढल्याची माहिती येथील घाऊक विक्रेत्याने दिली आहे.
राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात संचारबंदीत जीवनावश्यक सेवा सुरळीतपणे सुरु ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्व खबरदारी घेत आहे. भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांची भाजी मंडईमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी चौकाचौकामध्ये हातगाडी, छोटे टेम्पो अथवा गाडीच्या माध्यमातून भाजीपाला व फळे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. सुरक्षिततेच्या कारणास्तव नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. महानगरपालिकांना किरकोळ हातगाडी विक्रेत्यांच्या मार्फत चौकाचौकामध्ये भाजीपाला व फळे रास्त भावात उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हा अधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच किरकोळ विक्रेत्यांनी देखील भाजी मंडईमध्ये एकाच वेळी गर्दी करू नये याबाबत संबधितांना सूचना देण्याबाबत निर्देश दिले आहेत.
दरम्यान, करकोळ भाजी विक्रेत्यांनी सर्व सुरक्षेचे नियम पाळणे आवश्यक आहे. मास्क, हातमोजे, तसेच सॅनिटायझरचा वापर करावा. भाजीपाल्याचा पुरवठा सुरू राहणार असून अफवांवर विश्वास ठेवू नका. गर्दी करू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी केले आहे. तर बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचा मुबलक साठा शिल्लक आहे. उगीचच नागरिकांनी घाबरून जावून साठा करून ठेवू नका. किरकोळ दुकानदार, व्यापाऱ्यांच्या वतीने नागरिकांना घरपोच किराणा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आल्याचे दिसून आले आहे.