ठाणे- लोकसभा निवडणुकीच्या निकालात प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीचा परिणाम काही मतदारसंघांत निश्चितपणे झाला आहे. त्यामध्ये कल्याण आणि भिवंडी मतदारसंघांत येणाऱ्या कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघांत 'वंचित'च्या उमेदवारांना मिळालेली मते आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस आघाडीसाठी चिंताजनक ठरणारी आहेत. तर, दलित व्होटबँक असलेल्या रिपाई आणि बसपा या पक्षांसाठीही ही धोक्याची घंटा ठरणार आहे.
'वंचित'चा फटका विधानसभा निवडणुकीतही? आघाडीसह रिपाईसाठी धोक्याची घंटा
पूर्व आणि कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघांत 'वंचित'च्या उमेदवारांना मिळालेली मते आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस आघाडीसाठी चिंताजनक ठरणारी आहेत. तर, दलित व्होटबँक असलेल्या रिपाई आणि बसपा या पक्षांसाठीही ही धोक्याची घंटा ठरणार आहे.
कल्याणमध्ये शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. तर, भिवंडीतून कपिल पाटील यांना यावेळी प्रतिकूल वातावरण असतानाही दीड लाखाच्या मताधिक्याने विजयी झाले. या दोन्ही मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी ५० हजारांच्यावर मते मिळाली. एकूण मतदानाच्या बाबतीत वंचितला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. कल्याणमधील वंचित आघाडीचे उमेदवार संजय हेडाऊ हे मूळचे नागपूरचे असूनही त्यांना ६५ हजार ५७२ एवढी मते मिळाली. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर अथवा ओवेसी यांची कोणतीही मोठी सभा मतदारसंघात झाली नाही. हेडाऊ यांना प्रामुख्याने अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात १६ हजार ९००, उल्हासनगरमध्ये १२ हजार ४१५, तर कल्याण पूर्व मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजे १७ हजार ९९७ एवढी मते मिळाली. मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर असलेल्या कळवा-मुंब्रा मतदारसंघात त्यांना अवघी ५२१० मते मिळाली. ओवेसी यांच्या प्रतिमेचा फायदा त्यांना याठिकाणी झाला नाही.
भिवंडी लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. अरुण सावंत मुंबई विद्यापीठात कुलगुरू होते. या व्यतिरिक्त कोणतीही राजकीय ओळख नसतानाही त्यांनादेखील ५१ हजार ४५५ एवढी मते मिळाली. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात त्यांना सर्वाधिक १५ हजार ७७५ मते मिळाली. आगामी विधानसभा निवडणुकीत कल्याण पूर्व आणि पश्चिम मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडीची मते निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे पारंपरिक मतांवर अवलंबून असलेल्या काँग्रेस आघाडी, रिपाई आणि बसपालाही वंचित बहुजन आघाडीकडे वळणारी मते आत्मपरीक्षण करायला लावणारी आहेत.