नवी मुंबई -राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पिकात घट झाली असून बाजारात कांद्याची आवक घटली आहे. त्याचा परिणाम म्हणून कांद्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. घाऊक बाजारात कांद्याने पन्नाशी गाठली आहे. एपीएमसी बाजारात सद्यस्थितीत कांद्याचे दर 10 ते 20 रुपयांनी वधारले आहेत. 20 ते 25 रुपयांनी विकला जाणारा कांदा 45 ते 50 रुपयांनी विकला जात आहे.
अवकाळी पावसाचा फटका
नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)मध्ये पुणे, नाशिक, नगर परिसरातून कांदा येतो. मात्र सद्यस्थितीत या भागात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका कांदा पिकाला बसला आहे. या पावसामुळे शेतात कांदा पीक खराब होत आहे. त्यामुळे चांगला नसलेला कांदा फेकण्याची नामुष्की शेतकरी वर्गावर आली आहे.
पावसामुळे साठवणुकीचा कांदा होतोय खराब
शेतकरी वर्गाने काढलेल्या कांद्याची चाळीत साठवणूक केली होती. त्या साठवणूक केलेल्या कांद्यावरदेखील पावसामुळे परिणाम पाहायला मिळत आहे. या साठवणुकीच्या कांद्याला ओलाव्यामुळे बुरशी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.
कांद्याचा तुटवडा भासण्याची शक्यता
अवकाळी पावसामुळे कांद्याचे उत्पादन घटले आहे. परिणामी कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. नवी मुंबईतील कांदा-बटाटा बाजारात आलेला कांदाही सडका असल्याने तो फेकून देण्याची वेळ व्यापारी वर्गावर आली आहे. पावसाचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. बाजारात जुना कांदा कमी प्रमाणात उरला असून तुटवडा भासण्याची शक्यता व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
10 ते 20 रुपयांनी वाढले भाव
एपीएमसी बाजारात सद्यस्थितीत कांद्याचे दर 10 ते 20 रुपयांनी वधारले आहेत. सद्यस्थितीत 20 ते 25 रुपयांनी विकला जाणारा कांदा 45 ते 50 रुपयांनी विकला जात आहे.