ठाणे -नवजात बाळाला रेल्वेत सोडून पळून जाणाऱ्या एका २७ वर्षीय महिलेसह तिच्या ३३ वर्षीय प्रियकराला कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Kalyan Railway Crime Branch Police) बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी महिला डोंबिवली (Dombivali) परिसरात राहणारी असून तिने पोटच्या गोळ्याला टिटवाळा रेल्वे स्थानकात सोडून पळ काढला होता. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात (Kalyan Railway Police Station) अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी महिलेने अनैतिक संबंधातून बाळाला जन्म दिला असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
- सीसीटीव्ही फुटेजमुळे पटली आरोपींची ओळख -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० नोव्हेंबर रोजी टिटवाळ्याहून निघालेल्या एका लोकलमध्ये एका डब्यातील सीटवर पिशवीत नवजात बाळ आढळून आले होते. त्यानंतर पंचनामा करीत कल्याण जीआरपीने या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. कल्याण जीआरपीसह कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरु केला. दरम्यान, मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले असता एक महिला कोपर रेल्वे स्थानकातून टिटवाळा जाणाऱ्या लोकलमध्ये बसली असून तिच्या हातात पिशवी असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आले. तसेच ज्या पिशवीत बाळ सापडले ती पिशवी आणि या महिलेच्या हातातील पिशवी एकसारखीच दिसत असल्याने पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली.
- विवाहित पुरुषासोबत होते महिलेचे अनैतिक संबंध -
कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अशरद शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचं एका ३३ वर्षीय विवाहित पुरुषासोबत संबंध होते. त्या आरोपी महिलेला त्यानेच डोंबिवलीत घर घेऊन दिलं होते. त्यांच्या दोघातील अनैतिक संबंधामुळं तिनं बाळाला जन्म दिला. मात्र, हे बाळ नकोसे झाल्यानं ती बाळाला लोकलमध्ये सोडून पळाली होती. या गुन्ह्यात तिचा प्रियकरही सहभागी होता. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी महिलेसह तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.