ठाणे -मुंबई-आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू तर तीन जण गंभीर झाले आहे. अपघातग्रस्त ट्रक नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात होता. मात्र अचानक आज पहाटे ४ वाजल्याच्या सुमारास १०० फूट खोल दरीत कोसळला. ही माहिती आपत्ती व्यवस्थापन टीमला मिळताच भरपावसात घटनास्थळी धाव घेऊन अथक प्रयत्नाने गंभीर जखमी असलेल्या ३ जणांना सुखरूप बाहेर काढले तर १ जणाचा जागीच मृत्यू झाल्याने सदर मृतदेह कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे.
सकाळी ७ वाजेपर्यत सुरु होते मदतकार्य
आज पहाटे चार वाजल्याच्या सुमारास महामार्ग पोलीस पथक घोटी व कसारा पोलीस ठाण्यात ट्रक क्र. एमएच -०४, जीयु- ७५९२ हा ट्रक कसारा घाटाच्या दरीत कोसळला याची माहिती मिळाली. त्यांनतर आपत्ती व्यवस्थापन टीमचे शाम धुमाळ, मनोज मोरे, दत्ता वाताडे, अक्षय राठोड, देवा वाघ, विनोद आयरे, लक्षमण वाघ, जस्सीभाई, बाळू मागे हे पथक नाशिक मुंबई घाटात रेस्क्यू साहित्य घेऊन घटनास्थळी पोहचलो. घटनस्थळी पोहचताच टीमच्या सदस्यांनी घाटात उतरून सर्वात आदी ४ जणांपैकी एकाला दरीतून बाहेर काढून पीकइन्फ्रा पेट्रोलिंग टीमने जखमीला रुग्णालयात रवाना केले. तर दुसऱ्या जखमीला पोलिसांच्या मदतीने दरीतून वर काढत रुग्णवाहिकेतून हॉस्पिटल रवाना केले. हे मदत कार्य सकाळी ७ वाजेपर्यंत सुरु होते.