ठाणे- भिवंडी तालुक्यातील जुनांदूर्खी (सातवीपाडा) येथील २० वर्षीय आदिवासी युवतीचा काविळच्या आजाराने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कविता रघुनाथ सातवी (रा. जुनांदूर्खी ) असे मृत युवतीचे नाव आहे. या आदिवासी युवतीच्या मृत्यूने भिवंडी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा समोर आला आहे.
हेही वाचा - बदलापुरात सेनेतच राडा : सेनेच्याच नगरसेवकांनी फोडले शिवसेना नगरसेवक वडनेरेंचे कार्यालय
मृतक कविता ही मुंबई-नाशिक महामार्गावरील वडपे बायपास येथील गोदामात नोकरी करत होती. तिच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती हलाकीची आहे. गेल्या पाच दिवसांपासून तिला उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे उपचारासाठी प्रथम खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने तात्काळ मुंबईच्या जेजे रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच बुधवारी रात्री तिचा मृत्यू झाला.
सद्या पावसाळ्याचे दिवस आहे. भिवंडी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत. शिवाय आदिवासी पाड्यांवर असलेल्या पाणवठ्यांचे शुद्धीकरण केले जात नाही. त्यामुळे नागरिकांना मृत्यूला कवटाळावे लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामपंचायत सदस्या प्रमिला प्रवीण पाटील यांनी व्यक्त केली आहे.