महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ठाणे स्टेशनवरून परराज्यातील प्रवाशांची अँटिजेन टेस्ट न करताच रिक्षावाल्यांकडून वाहतूक, भाजपकडून कारवाईची मागणी

सॅटिस पूलावरील अँटिजेन सेंटरवरील रांगेत असलेल्या व पहाटे येणाऱ्या रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांची बेकायदेशीरपणे रिक्षाचालकांकडून वाहतूक केली जात आहे. या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यासाठी आणखी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी. बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना दंड ठोठवावा, अशी मागणी संजय वाघुले यांनी वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याकडे केली आहे.

transport from thane station by rickshaw pullers without antigen test of other state passengers
ठाणे स्टेशनवरून परराज्यातील प्रवाशांची अँटिजेन टेस्ट न करताच रिक्षावाल्यांकडून वाहतूक

By

Published : Oct 8, 2020, 7:31 PM IST

ठाणे :ठाणे रेल्वे स्टेशनवर सुरू असलेली अँटिजेन टेस्ट टाळत अनेक रिक्षाचालकांकडून परराज्यातील शेकडो कुटुंबांना परस्पर ठाण्यातील विविध भागात सोडण्यात येत आहे. या धक्कादायक प्रकारामुळे कोरोना टेस्टविना ठाणे शहरात हजारो नागरिक दाखल झाले असल्याचा अंदाज आहे. त्यातून भविष्यात मोठे संकट निर्माण होण्याची भीती लक्षात घेऊन, ठाणे रेल्वे स्टेशनवर २४ तास अँटिजेन टेस्ट सेंटर सुरू करावे, अशी मागणी भाजपचे महापालिकेतील गटनेते संजय वाघुले यांनी केली आहे. त्याचबरोबर बेकायदेशीरपणे प्रवासी पळविणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मागणी वाहतूक पोलिसांकडे केली आहे.

परराज्यातून ठाणे स्टेशनवर उतरणाऱ्या रेल्वेगाड्यांमधील नागरिकांची तपासणी करण्यासाठी ठाणे महापालिकेने रेल्वे स्टेशनवर मोफत अँटिजेन सेंटर सुरू केले आहे. मात्र, या केंद्राची वेळ सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाचपर्यंत आहे. गेल्या काही दिवसांपासून परराज्यातून पहाटेच्या सुमारास रेल्वेगाड्या येतात. त्यातून उतरणाऱ्या नागरिकांना अँटिजेन टेस्टसाठी सकाळी साडेदहापर्यंत थांबावे लागते. या काळात काही रिक्षाचालकांकडून बेकायदेशीरपणे परराज्यातील नागरिकांना अँटिजेन टेस्ट टाळून परस्पर शहरात नेले जाते. त्यासाठी त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा भाडे उकळले जात आहे, याकडे गटनेते व ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी लक्ष वेधले. या परिस्थितीमुळे भविष्यात ठाणे शहराला उद्भवणारा धोका लक्षात घेऊन तातडीने ठाणे रेल्वे स्टेशनवर २४ तास अॅंटिजन टेस्ट सेंटर सुरू करावे, अशी मागणी वाघुले यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे.

सॅटिस पूलावरील अँटिजेन सेंटरवरील रांगेत असलेल्या व पहाटे येणाऱ्या रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांची बेकायदेशीरपणे रिक्षाचालकांकडून वाहतूक केली जात आहे. या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यासाठी आणखी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी. बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना दंड ठोठवावा, अशी मागणी संजय वाघुले यांनी वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याकडे केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details