ठाणे -वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन मालकावर वाहतूक पोलिसांची करडी नजर आहे. तर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली असून २५ डिसेंबरपासून वाहतूक पोलीस आता 'ड्रिंक अँड ड्राइव्ह' विरोधात मोहिम राबवणार आहे. दरम्यान वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांमुळे ई-चलनाद्वारे रोज तब्बल १० लाखांचा महसूल सरकारी तिजोरीत जमा होत असल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली. मागील १३ दिवसांच्या कारवाईत वाहतूक पोलिसांनी एक कोटी ३१ लाखांची विक्रमी वसुली केली. आता २५ डिसेंबरपासून 'तळीराम' रडारवर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनाचाचा प्रादुर्भाव पाहता यंदा वाहतूक पोलिसांनी ड्रिंक अँड ड्राइव्हसाठी विशेष उपायोजना केली आहे. तपासणीसाठी असलेल्या पोलिसांना फेसशील्ड, मास्क, आणि ब्रेथअॅनेलायझरसह सज्ज राहणार आहे. त्यातच कोविडचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून ड्रिंक अॅन्ड ड्राइव्ह तपासणी करताना ब्रेथअॅनेलायझरचा पाइप हा प्रत्येक वाहनचालकाला स्वतंत्र वापरण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना कोरोनापासून सुरक्षा मिळणार आहे.
आतापर्यंत लाखोंचा दंड वसूल
२०१९ मध्ये वाहतूक विभागाने १८ वाहतूक उपविभाग निर्माण केले आणि दंडात्मक ई-चलन पद्धतीने आकारणी सुरू केली. १४ फेब्रुवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत ६ लाख ३० हजार २०४ गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून दंडापोटी २१ कोटी १४ लाख रुपयांची वसुली केलेली आहे. तर १ जानेवारी, २०२० ते १३ डिसेंबर या कालावधीत वाहतूक विभागाने १८ उपविभाग मिळून केलेल्या एकंदर कारवाईत वाहतूक पोलिसांनी ४ लाख २३ हजार गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून २५ कोटी ५ लाखाची वसुली केलेली आहे. वाहतूक नियम उल्लंघन आणि ड्रिंक अॅन्ड ड्राइव्ह अंतर्गत प्रतिदिन १० लाख रुपयांच्या दंडाची आकारणी करण्यात येत आहे.
नव्या वर्षाचे स्वागत करा...मात्र जपून!
नव्या वर्षाचे स्वागत निश्चितच करावे, पण मद्य किंवा अमली पदार्थ घेऊन वाहन चालवल्याने अपघाताच्या संख्येत भर पडत आहे. गेल्या वर्षीही अपघातांची संख्या मोठी होती. यंदाही कोविड काळात अपघात घडले आहेत. त्यामुळे मद्य किंवा अंमली पदार्थाच्या अंमलाखाली वाहन चालवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. नशेच्या अधीन राहून वाहन चालवल्याने देशभरात वर्षाला १ लाख ३४ हजार लोक अपघातात मृत्यू पावतात. तर महाराष्ट्रात वर्षाला किमान १३ हजार अपघाती मृत्यू होतात. २५ डिसेंबरपासून ड्रिंक अॅन्ड ड्राइव्ह मोहिम सुरू करणार असून नशेत वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार आहे, असे वाहतूक उपायुक्तांनी सांगितले.