ठाणे - प्लॅास्टिकच्या खेळण्याचा व्यवसाय करणाऱ्या वयोवृद्ध व्यापाऱ्याला लॉकडाऊनच्या काळात तोटा आला. दरम्यान ते अचानक बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या व्यापाऱ्याचे नाव रवी भगवानदास तोलानी (६१) असे आहे. ते उल्हासनगर शहरातील कॅम्प नं ३ येथील ओटी सेक्शन, शिवमंदीर जवळील स्टेशन रोड येथे विनस अपार्टमेंटमध्ये राहतात.
पैसे कलेक्शनसाठी गेले ते परतलेच नाही-
बेपत्ता व्यापारी रवी हे प्लॅास्टिकच्या खेळण्यांचा व्यवसाय करतात. मात्र लॉकडाऊनच्या काळात व्यवसायात तोटा होऊन ते कर्जबाजारी झाले. त्यामुळे ते तणावाखाली राहत असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. दोन चार दिवसांसाठी रवी हे त्यांचा भाऊ राजू तोलानी यांच्याकडे मुक्कामासाठी गेले होते.
यादरम्यान १९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास रवी यांनी भाऊ राजू यांना डोंबिवली येथे मी पैसे कलेक्शनसाठी जातो, असे सांगितले. मात्र ते गेले तर परत आलेच नाहीत. त्यांनतर उल्हासनगर परिसरात त्यांच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला पण ते मिळून आले नाही.