महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ठाण्यात दुकानदारांना गंडा घालणाऱ्या तीन महिलांना बेड्या - Three women arrested

कोणत्याही दुकानात घुसून दुकानदारांना आपल्या बोलण्यात गुंतवून चोरी करणाऱ्या तीन सराईत महिलांना अटक करण्यात डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांना यश आले आहे. या तिघींकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तीन महिलांना बेड्या
तीन महिलांना बेड्या

By

Published : Jun 13, 2021, 7:12 PM IST

ठाणे - कोणत्याही दुकानात घुसून दुकानदारांना आपल्या बोलण्यात गुंतवून चोरी करणाऱ्या तीन सराईत महिलांना अटक करण्यात डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांना यश आले आहे. या तिघींकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्राची बाळकृष्ण जाधव (26), छाया मरगू जाधव (45) आणि रेश्मा उमाकांत जाधव (32) अशी या तिघींची नावे आहेत. या तिघी जणी अंबरनाथमधील शास्त्रीनगरात राहणाऱ्या आहेत.

चोरट्या महिलांचे एलसीडी टीव्ही चोरताना फुटले बिंग
या तीन महिला खरेदीचा बहाणा करून अंबरनाथ, डोंबिवली परिसरातील दुकानांमध्ये घुसायच्या. तसेच दुकानदारांना आपल्या बोलण्यामध्ये गुंतवून ठेवायच्या. असाच प्रकार त्यांनी डोंबिवलीच्या एका दुकानात करण्याचा प्रयत्न केला. उल्हासनगर येथे राहणारे जितू आहुजा (23) यांच्या मालकीचे डोंबिवली पूर्वेकडे शिवमंदिर रोडवर मॉडेल इलेक्ट्रॉनिक नावाचे इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल्स वस्तू विक्रीचे दुकान आहे. बुधवारी दुपारी जितू हे दुकानात असताना या तीन महिला आल्या. गीझर खरेदी करण्याचे त्यांनी नाटक केले. गीझरची किंमत काय? त्याचे वैशिष्ट्य काय? अशा प्रकराचे प्रश्न विचारत दुकान मालक जितू आहुजा यांना बोलण्यात गुंतवून ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर नजर चुकवून या तिघींनी मिळून दुकानातील 32 इंची 29 हजार 990 रुपये किंमतीचा एलसीडी टीव्ही उचलून दुकानाबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. इतका मोठा टीव्ही चोरून नेताना दुकानदाराची नजर या तीन महिलांवर पडली आणि त्यांच्या चोरीचे बिंग फुटले. दुकानादाराने तात्काळ या महिलांना पकडून पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी या तिन्ही महिलांची कसून चौकशी केली. आतापर्यंत केलेल्या चौकशीमध्ये या तिघींनी मिळून या आधीही अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने चोऱ्या केल्याची कबूली दिली आहे.

आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
कल्याण न्यायालयात या चोरट्या महिलांना हजर केले असता, न्यायालयाने अधिक चौकशीकरिता पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आता पोलिसांकडून या चोरट्या महिलांची अजूनही सखोल चौकशी सुरू असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा -घाटकोपरमध्ये स्लॅब कोसळून कार बुडाली पाण्यात; पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details