ठाणे - बुधवारी ठाणे गुन्हे शाखेने पाचपाखाडी येथील प्लॅटमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. एक घर मालकीण, एक महिला एजंट आणि एक पुरुष एजंट आणि दोन अभिनेत्री अशा पाच जणांना अटक करण्यात आली. गुरुवारी गुन्हे शाखेने घुमजाव करीत दोघी अभिनेत्रीना रेस्क्यू केले अशी भूमिका मांडली आहे. तर अनैतिक धंदा चालविल्या प्रकरणी घरमालकीण, महिला आणि पुरुष एजंट अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर दोन अभिनेत्री याना मात्र सुधारगृहात रवाना केल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-१ चे पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणे यांनी दिली. तर तीन आरोपीना न्यायालयाने ७ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
बनावट ग्राहक पाठवून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
२ जून रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे पाचपाखाडी, नौपाडा परिसरात एक महिला सिने अभिनेत्री आणि मॉडेल पुरविते, ग्राहकांकडून पैसे घेऊन तिच्या घरी वेश्यागमनासाठी जागा उपलब्ध करून देते अशी माहिती मिळाली होती. त्या आधारे बुधवारी गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून अमृतनगर मुंब्रा येथे राहणाऱ्या महिला एजंटकडे २ अभिनेत्री आणि मॉडेलची मागणी केली. पाहिलेने प्रत्येकी २ लाख रुपयांची मागणी केली. तर तडजोडीत रक्कम १ लाख ८० हजारावर निश्चित करण्यात आली. सदर महिला एजंटने विशाल उर्फ सुनीलकुमार उत्तमचंद जैन(४२) रा. शास्त्रीनगर, गोरेगाव याच्या मार्फत दोन अभिनेत्रींना वेश्यागमनासाठी त्यांना पैशाचे आमिष दाखवून प्रवृत्त केले. तर या मुलींना पाचपाखाडी नौपाडा येथील घरी बोगस ग्राहकांसोबत पाठविल्या. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने केलेल्या छापेमारीत पोलीस पथकाला दोन अभिनेत्री, एक महिला एजंट, एक पुरुष एजंट आणि ज्या घरात वेश्यागमन होते त्या घराची मालकीण अशा पाच जणांना ताब्यात घेतले. पोलीस पथकाने सदर कारवाईत २ लाख १४ हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन, वस्तू, पर्स, निरोधची पाकिटे आणि रोख रक्कम हस्तगत केले.