मीरा भाईंदर -उत्तन येथे रात्री फेरफटका मारायला गेलेल्या पंधरा वर्षीय मुलीवर सामूहिक लैगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रसंगातून दुसऱ्या मुलीला पळ काढण्यास यश मिळण्याने तिच्यावरील प्रसंग टळला. या प्रकरणी तीन युवकांविरोधात उत्तन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून 22 जानेवारीपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तीन नराधम आरोपीला अटक
उत्तन येथे रात्री पीडित मुलगी ११.३०च्या सुमारास आपल्या मैत्रिणी व मित्रांसोबत उत्तन पातानबंदर येथील सी फूड या मासळी ठेवणाऱ्या शीतगृहामागील मोकळ्या जागेत गप्पा मारत बसली होती. त्यावेळी तेथे संजय राजाराम भारती (२६), अंबेस पूजन गौतम (२४) व इंद्रजीत शिवपूजन गौतम (२४) हे बोटीवर काम करणारे तीन मजूर आले. त्यांनी पीडित मुलीच्या मैत्रिणी व मित्रांना मारहाण करीत शिवीगाळ केली. त्यामुळे ते तेथून पळून जात असतानाच पीडित मुलगी व आरोपींनी तिच्या एका मैत्रिणीचा हात पकडण्याचा प्रयत्न केला असता ती पळून गेली. त्यांच्या तावडीत पीडित मुलगी सापडली. आरोपींपैकी दोघांनी तिला पकडून तिच्यावर सामूहिक लैगिक अत्याचार केला.
'पोक्सो'अंतर्गत गुन्हा दाखल
घटनेची माहिती पीडित मुलीच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांनी उत्तन पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरीत आरोपींचा शोध घेत त्यांना साडे चार तासाच्या आत गजाआड केले. त्यांच्यावर बाललैंगिक अत्याचारासह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बुधवारी विशेष पोक्सो न्यायालयात हजर केले असता न्या. के. डी. शिरभाटे यांनी 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती उत्तन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी यांनी दिली.