ठाणे - भिवंडी पोलिसांच्या हाती लागलेल्या २५ कोटींच्या बनावट पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या बॉक्सचे कनेक्शन वसईला असल्याचे उघडकीस आले आहे. गुरुवारी नारपोली पोलिसांनी वसई तालुक्यातील वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गोदामावर छापा टाकला. याठिकाणाहून बनावट पॅकेजिंग बॉक्ससह छपाईचे साहित्य आढळून आले. त्यांनतर नारपोली पोलिसांनी हे गोदाम देखील सील केले.वसई- वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत या गुन्ह्यातील आणखी ३ आरोपींना पोलिसांनी अटक केल्याने आरोपींची संख्या चारवर गेली आहे.
भिवंडीतील बनावट पॅकेजिंगचे धागेदारे वसईला; आरोपींची संख्या ४ वर - Thane fake packaging case
भिवंडी पोलिसांच्या हाती लागलेल्या २५ कोटींच्या बनावट पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या बॉक्स प्रकरणी वसईतून तीन आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी वालीव ठाण्याच्या हद्दीतील एका गोदामावर छापा टाकून ते बनावट पॅकेजिंग बॉक्स छपाई साहित्य आढळून आल्याने सील केले.
भिवंडीतील वळपाडा येथील पारसनाथ कंपाउंड गाळा नंबर 8 येथे एचपी, केनॉन, सॅमसंग, अप्सन या नामवंत इलेक्ट्रॉनिक कंपन्यांचे पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारे सुमारे २५ कोटींहून अधिक रकमेचे साहित्य बुधवारी दुपारी छापा टाकून भिवंडी पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी गोदाम मालक किशोर आंबा बेरा ( २८ रा.गणेश चाळ , ठाणे ) यास नारपोली पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी भिवंडीचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे करत आहेत. पारसनाथ येथील गोदामात ठेवलेल्या बॉक्स व इतर साहित्याची छपाई वसई येथील वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गोदामात करण्यात येत होती.
गुरुवारी वसई-वालीव येथील अनधिकृत बॉक्स छपाईच्या गोदामावर नारपोली पोलिसांनी छापा टाकला असून सदरचे गोदाम देखील सील करण्यात आले आहे. या ठिकणाहून तीन जणांना नारपोली पोलिसांनी ताब्यात घेतले असून हे अनधिकृत काम मागील तीन महिन्यांपासून सुरु होते, अशी माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली. या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली असून आणखी सखोल तपास करण्यात येणार आहे. या प्रकरणात आणखीही मोठे धागेदोरे हाती लागणार असल्याची शक्यता उपायुक्त शिंदे यांनी वर्तवली आहे .