नवी मुंबई -चार दिवसापूर्वी बांधकाम व्यावसायिकाची भररस्त्यात झालेल्या हत्येने संपूर्ण नवी मुंबई शहर हादरले होते. या हत्येत सहभागी असणाऱ्या तीन आरोपींना मुंबई पोलिसांनी गजाआड केले आहे. यातील दोन आरोपींना खारघर परिसरातून रबाळे पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले आहे. तर तिसऱ्याही आरोपीला देखील पोलिसांनी नंतर ताब्यात घेतले आहे, अशी माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ-1 चे उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली.
बांधकाम व्यावसायिक प्रवीण तायडे खून प्रकरणी तीन आरोपींना अटक... हेही वाचा...नवी मुंबईमध्ये बांधकाम व्यावसायिकाची भरदिवसा गोळी झाडून हत्या
बांधकाम व्यवसायिक प्रवीण तायडे (35) हे गुरुवारी दत्तात्रय जोगदंड (35) याच्यासोबत मोटरसायकलवरून जात असताना पाठीमागून आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या मोटार सायकलला धडक दिली. त्यामध्ये प्रवीण तायडे खाली पडताच कारमधील एकाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी डोक्याला लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. यासंदर्भात उपस्थित स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली होती. व्यवसाय वादातून ही हत्या झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज होता
तायडे यांची हत्या झाल्यानंतर काहीच वेळात संशयित आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुन्ह्यात वापरलेली कार कोपरखैरणे येथे आढळून आली होती. त्यावरून जयेश पाटील (37), संतोष डोरा उर्फ (गुड्डू) (22) आणि देवेंद्र माळी या आरोपींना अटक केली. अधिक चौकशी केली असता, त्यांनी ही हत्या केल्याचे पोलिसांसमोर स्पष्ट झाले.
आरोपींच्या अटकेसाठी गुन्हे शाखा रबाळे पोलीस ठाणे यांच्या पथकाने शोध घेण्यास सुरुवात केली होती. त्यात, संबंधित आरोपी लोणावळा येथे लपले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार प्राप्त माहितीच्या आधारे तीनही आरोपींना लोणावळा येथे पोलीस पथक शोधण्यासाठी गेले. तेव्हा आरोपी खारघर येथील निफ्ट कॉलेजजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि मोटार सायकलवरून आलेल्या जयेश पाटील, राजेंद्र डोरा यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी तिसरा आरोपी देवेंद्र माळी याचे नाव सांगितले. पोलिसांनी त्यानंतर देवेंद्र माळी यालाही ताब्यात घेतले.
व्यावसायिक कारणावरून प्रवीण तायडे आणि जयेश पाटील यांच्यात सात ते आठ महिन्यापासून खटके उडत होते. तसेच मृत प्रवीण तायडे आणिआरोपी जयेश हे एकाच शाळेतील असल्याने त्यांच्यात जुना वादही होता. या वादाचा विपर्यास झाल्याने जयेश पाटील याने प्रवीण यांचा काटा काढण्याचा बेत आखला. गुरुवारी तळवली परिसरात तायडे यांच्या बांधकाम साइटवर पाणी उपसा करण्याची मशीन बंद पडल्याने मोटार दुरुस्ती करण्यासाठी एका व्यक्तीला घेऊन प्रवीण आले होते. दुरुस्तीचे काम आटपून परतत असताना तेथे दबा धरून बसलेल्या तीनही आरोपींनी तायडे यांच्या मोटारसायकलचा पाठलाग करून त्यांच्यावर गोळीबार केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. यात तायडे यांच्या मागे बसलेला व्यक्तीही जखमी झाला होता.
गुन्ह्यात वापरलेली कार आरोपी कोपरखैरणे येथे सोडून पळाले होते. ही कार पोलिसांच्या हाती लागल्यानंतर जयेश पाटीलवर पोलिसांचा संशय अधिकच बळावला. पोलिसांनी त्याला आणि त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेऊन गजाआड केले आहे. त्यांच्याविरोधात या हत्येप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींकडून दोन पिस्तूल 6 जिवंत काडतुसे, अल्टो कार, तसेच एक मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे.