ठाणे -कल्याण - डोंबिवलीत चोरी, घरफोडी, वाटमारी करणाऱ्या गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. दुचाकीवरून आलेल्या लुटारूंनी सोसायटीत घुसून एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविले आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाले असून या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा -शिवसेना महापौर नरेश म्हस्के यांची राणे समर्थनार्थ नारेबाजी; व्हिडिओ झाला व्हायरल
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र खेचून ठोकली धूम
डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील आरएस 16 या नव प्राजक्ता सोसायटीत लक्ष्मी माधव (वय 72) या राहतात. मंगळवारी दुपारी 2.50 च्या सुमारास या सोसायटीच्या गेटबाहेर दुचाकी थांबवून 2 जण आले. पत्ता विचारण्याचा बहाणा करत वयोवृद्ध लक्ष्मी माधव यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून लुटारूंनी दुचाकीवरून धूम ठोकली.
मंगळसूत्र सोन्याचे नसून बेंटेक्सचे
सुदैवाने लक्ष्मी यांच्या गळ्यातील लांबविलेले मंगळसूत्र सोन्याचे नसून बेंटेक्सचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे, लुटारूंच्या आनंदावर नंतर विरजण पडणार असल्याची रहिवाशांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. कल्याण - डोंबिवलीत गृहिणींचे सौभाग्यालंकार लांबविणारे लुटारू पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. मात्र या लुटारूंशी दोन हात करण्याऐवजी आता डोंबिवलीकर गृहिणींनी नवी शक्कल लढवली आहे. लुटारू सोन्याचे दागिने लक्ष करत असल्याने या गृहिणींनी आता नकली दागिने परिधान करणे पसंद केल्याचे लक्ष्मी माधव यांच्या बाबतीत घडलेल्या घटनेतून समोर आले आहे. तरीही या प्रकरणी लक्ष्मी माधव यांनी स्थानिक मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा -जन आशीर्वाद यात्रा; मतदारांचे आशीर्वाद आणि संवाद बाजूला ठेऊन पक्षाची वातावरण निर्मिती