ठाणे - कल्याण तालुक्यातील म्हारळ गावात चोरांनी धुडगूस घातला असून एकाच रात्रीत ५ ते ६ ठिकाणी घरफोडी केली आहे. विशेष म्हणजे भरवस्तीतील माजी पंचायत समिती सभापतीच्या घरात शिरकाव करीत अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या अंगावरील दागिने ओरबाडून तसेच परिसरातील बंद घराचे टाळे तोडून लाखोंचे दागिने व रोकड घेऊन पोबारा केला आहे. याप्रकरणी कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांच्या टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.
चोरट्यांच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत -
कल्याण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील म्हारळ गावातील दाट लोकवस्तीत राहत असलेल्या कल्याण पंचायत समितीच्या माजी सभापती रंजना केतन देशमुख यांच्या घरावर चोरट्यांनी शिरकाव केला. त्यावेळी अज्ञात टोळीने घरात प्रवेश करून सभापतीच्या सासूबाई कमल देशमुख यांच्या खोलीत घुसून त्यांच्या कानातील, कर्णफुले ओरबाडून नेले. याशिवाय अण्णासाहेब पाटील नगर, साईदिप काँलनी क्रांती नगर, गणेशनगर आदी परिसरात बंद घराचे टाळे तोडून दागिने, रोकड असा लाखोंचा ऐवज लुटून नेत पोबारा केला. मात्र तीन दिवसापूर्वी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिक चोरट्यांच्या दहशतीमुळे भयभीत झाले आहेत.