ठाणे -सामान्य नागरिकांना अद्यापही लोकल प्रवासाची मुभा नाही. मात्र, चोरट्यांना लोकल प्रवासाची जणू काही मुभाच दिल्याची घटना समोर आली आहे. एका चोरट्याला लोकलमध्ये मोबाईल चोरी करताना प्रवाशांनी रंगेहात पकडून त्याला चांगलाच चोप दिला आहे. या चोरट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक करुन पुढील तपास सुरू केला आहे. विनोद जाधव (वय 19) असे चोरट्याचे नाव आहे.
लोकल ट्रेनमधील चोरट्यास अटक सध्या लोकलमध्ये फार कमी प्रमाणात प्रवाशांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी महिलांसाठी लोकल सुरू झाली. सकाळी 11 ते 3 आणि रात्री सातनंतर महिला लोकल प्रवास करू शकतात. बाकी सर्व सामान्य नागरिक लोकलमध्ये कधी प्रवास करणार या प्रतिक्षेत आहे. प्रत्येक स्टेशनवर आरपीएफ व जीआरपी प्रवाश करणाऱ्या प्रवाशांचे आयकार्ड चेक करुन सोडण्यात येते.
काही दिवसापूर्वी बोगस आयकार्ड घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडले गेले आहे. मात्र,अटकेत असलेला विनोद या चोरट्याकडे आधारकार्ड नाही. दुसरे काही कागदपत्रे नाहीत. तोच लोकलमध्ये बसून डोंबिवलीहून काल रात्री एक वाजता लोकल बदलापूरला पोहोचणार होती. तेव्हा एका कोपऱ्यात बसलेल्या आरोपी विनोद याने विकास चौधरी नावाच्या प्रवाशाचा मोबाईल हिसकावून घेतला. विकास हे झोपेत होते. हा प्रकार घडताच त्यांची झोप उडाली. त्यांनी विनोद याला पकडले. अन्य प्रवाशांनी विनोदला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिला कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मीक शार्दुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अरशद शेख हे तपास करत आहेत.
सध्या कल्याण जीआरपीने विनोदला अटक केली आहे. विनोदकडे कोणतेही कागदपत्रे नाही. त्याने या आधी चोरी केली आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. तर दुसरीकडे चोरट्याचा ट्रेन प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे. हा चोरटा लोकलमध्ये घुसला कसा हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.