ठाणे -मुंबईपासून केवळ 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या भिवंडी तालुक्यातील दिघाशी या गावातील धर्मीचा पाडा या आदिवासी वस्तीमध्ये स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही काळाकुट्ट अंधार आहे. 25 कुटुंब असलेल्या या वस्तीत अजिबातच रस्ता नाही. चिखल तुडवत, नाले ओलांडत डिड किलोमीटरचा प्रवास करत या लोकांना मुख्यरस्त्यावर यावे लागले. आतापर्यंत या गावात फक्त 2 हातपंप आहेत. एप्रिल महिन्यातच हे हातपंप बंद होतात. या गावात आजपर्यंत रस्त्याचा साधा दगड पडलेला नाही. ना मुख्य रस्त्याला जोडलेला रस्ता ना अंतर्गत रस्ता ना पेव्हर ब्लॉक ना काँक्रेट रस्ता कसलासा पत्ता नाही. या ठिकाणी अत्यंत परिश्रम घेणारे शेतमजूर आहेत. मात्र, शेतीला पुरेसे पाणी देण्याची, वीज देण्याची साधी तसदी कुणी घेतलेली नाही. इतके वर्ष या ठिकाणी वीज कनेक्शन देखील नव्हते, श्रमजीवी संघटनेच्या प्रयत्नांनी गेल्या वर्षी विजेचे खांब आले. मात्र, नंतर ते काम ही अर्ध्यावरच असल्याचे समोर आले आहे.
वृद्ध रुग्णांची चिखलातून वाट -
जिल्ह्यातील पाड्यात अंगणवाडी नाही. गावातील अंगणवाडीचे कुणी रस्ताच नसल्याने पाड्याकडे फिरकत नाही. शाळेत जाणारी मुलं शाळा सुरू असताना पावसाळ्याचे चार महिने शिक्षणापासून वंचित राहतात. परिणामी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जातात. परवाच या पाड्याचे नाव जिच्या नावावर आहे, त्याच धर्मीबाई रायात या 85 वर्षीय आजीचा परवा पाय फ्रॅक्स्चर झाला. तिला दवाखान्यात नेण्यासाठी अक्षरशः एक जुन्या 2 लोखंडी पलंगाचा आधार घेत तीला पालखी करून मुख्य रस्त्यापर्यंत नेले. आज श्रमजीवी संघटनेचे प्रमोद पवार आणि त्यांचे सहकारी नवनाथ भोये, रुपेश जाधव, निलेश चव्हाण, सुशांत चौधरी यांनी स्थानिक गावकमेटी कार्यकर्त्या संगीता भोईर, बाळा भोईर तसेच आदेश रायात यांच्या सोबतीने या पाड्यात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी कमीत कमी शेतकरी बाधित करता, कसे रस्ता करता येईल, याबाबत ग्रामस्थांना घेऊन त्यांची मतं जाणून घेतली. याबाबत श्रमजीवी संघटना आक्रमक होणार एवढे नक्की. स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवी वर्षातही आदिवासी गरिबांच्या नशिबी, असे विदारक जगणे येत असेल तर यापेक्षा दुर्दैवी काय असेल, हा प्रश्न आहे.