ठाणे -पावसाळा सुरू झाला की ठाणेकरांना नेहमीच खड्डे, वाहतूक कोंडी ( Traffic jam in Thane ) हे नेहमीचच झालं आहे. ठाण्यात अनेक दिवसांपासून खड्ड्यांचे साम्राज्य ( Road potholes in Thane ) झाले असून यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे . या वाहतूक कोंडीमुळे ठाणेकरांना त्रास सहन करावा लागत आहे. ठाण्यातील खड्ड्यांकडे दुर्लक्ष करून ठेकेदार डिव्हाईडर च्या कामांमध्ये व्यस्त असताना दिसून येत आहे. त्यामुळे खड्डे भरणे महत्वाचे की सुस्थितीत असणारे डिव्हाईडर तोडून पुन्हा बनवणे गरजेचे असा सवाल ठाणेकर नागरिक करत आहे.
नागरिकांच्या पैशांची नासाडी -ठाण्यातील खड्डे विशेषतः घोडबंदर मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. मुख्यमंत्र्यांचा ( CM Eknath Shinde ) ठाणे जिल्हा खड्यांमुळे चर्चेचा विषय ठरला असून नागरिक संताप व्यक्त करत आहेत. जुने डिव्हाईडर चांगल्या स्थितीत असून देखील पुन्हा बांधणे गरजेचे नसतानाही नागरिकांच्या पैशांची नासाडी होत आहे. खड्डे भरणे सोडून अशा गोष्टींकडे लक्ष केंद्रित केले जाते त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो असे ठाणेकर नागरिकांचे म्हणणे आहे.