ठाणे - लॉकडाऊनला कंटाळून घरातून निघून गेलेल्या 17 वर्षीय युवकाला ठाणे पोलिसांनी सुखरूप स्वगृही पोहोचवले. त्यामुळे ठाणे पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पोलिसांना शाब्बासकी देतानाच, पालकांनाही आपल्या पाल्यांवर अभ्यासाचे अथवा अवास्तव अपेक्षांचे ओझे न लादता मुलांना स्वच्छंदीपणे राहू द्या, असे आवाहन केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनला आबालवृद्धांसह विद्यार्थीही कंटाळले आहेत. शाळा-कॉलेज बंद असल्याने मुक्तपणे हिंडण्याफिरण्यावर बंधने आली असून खेळ, जीम बंद असल्याने कसरतीलाही खीळ बसली आहे. त्यामुळे ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट भागात राहणारा 17 वर्षीय सिद्धार्थ खरबे हा युवक बुधवारी भल्या पहाटे सायकल सवारीसाठी घरातून निघाला. मात्र, सकाळचे 10 वाजले तरी घरी न परतल्याने पालक चिंताग्रस्त झाले. नेहमी सायंकाळी सायकलींगसाठी जाणारा सिद्धार्थ आज सकाळीच घरातून गेला होता. मोबाईलवरही संपर्क होईना. त्यानंतर त्याच्या पालकांनी पोलीस स्टेशन गाठले. अखेरचे लोकेशन भांडुप दाखवल्यानंतर सिद्धर्थला शोधण्यासाठी ठाणे पोलिसांनी मुंबईकडे कूच केली.