महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन कल्याण पश्चिमेत रिक्षाचालकास बदडून लुटले - thane police news

रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वयोवृद्ध चालकाला गावभर फिरवून पेढा खायला दिला. हर्षोल्हासित होऊन या रिक्षावाल्याने पेढा खाल्यानंतर गुंगी आली आणि संधीचा फायदा उठवून लुटारूंनी बेदम झोडपून त्याच्याकडील ऐवजासह पळ काढला.

By

Published : Aug 18, 2021, 7:23 PM IST

ठाणे -अनोळखींकडून जलपेय वा खाद्यपदार्थ घेऊन ते खाण्याने मोठा धोका पत्करावा लागत असल्याच्या घटना वारंवार घडत असतात. असाच एक प्रसंग रिक्षावाल्यावर गुदरला आहे. रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वयोवृद्ध चालकाला गावभर फिरवून पेढा खायला दिला. हर्षोल्हासित होऊन या रिक्षावाल्याने पेढा खाल्यानंतर गुंगी आली आणि संधीचा फायदा उठवून लुटारूंनी बेदम झोडपून त्याच्याकडील ऐवजासह पळ काढला. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी पेढा देणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे.

मुलगा झाल्याची थाप मारून दिला पेढा

कल्याण पश्चिमेकडील गोविंदवाडी परिसरातील रेती बंदर रोडला भद्रनिसा चाळीत राहणारे आमिर बुडान शेख (57) हे शनिवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास MH05/डी झेड/2618 क्रमांकाची त्यांची रिक्षा घेऊन कल्याण रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या एसटी डेपोसमोर प्रवासी भाडे घेण्यासाठी थांबले होते. इतक्यात दोन अनोळखी इसमांनी रिक्षास हात दाखवून त्यांना वालधुनी येथील रेल्वे हॉस्पिटल येथे जायचे असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे आमिर शेख यांनी 70 रूपये भाडे होईल, असे सांगितले. हे दोघेजण रिक्षात बसले. वालधुनी दिशेकडे जात असताना त्या अनोखळी इसमांनी आमिर यांना उल्हासनगर येथे चालण्याचे सांगितले. त्याप्रमाणे आमिर यांनी उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटल येथे नेले. त्यातील एका प्रवाशाने आमिर यांना पत्नीस भेटून येतो, असे असे सांगून रिक्षातून उतरून तो इसम निघून गेला. पुन्हा काहीवेळात पुन्हा रिक्षाजवळ आला असता त्याच्या हातात असलेला पेढ्यांचा बॉक्स पुढे करून मला मुलगा झाला आहे, असे बोलून आमिर यांना पेढा खाण्यास दिला. आनंदाच्या भरात आमिर यांनी त्यातील पेढा खाल्ला.

चालकाला गुंगी आल्याचे लुटारू प्रवाशांनीना हेरले, अन्...

रिक्षाचालक आमिरने गुंगीचे औषध असलेला पेढा खाल्ल्यानंतर अनोळखी इसमांनी मावशीला भेटण्याकरीता उल्हासनगरच्या खेमाणी येथे घेऊन जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे आमिर यांनी त्यांची रिक्षा खेमाणी येथे नेली. त्यातील एक इसम उतरून काहीवेळाने परत रिक्षात आला आणि आमिर यांना कल्याण रेल्वे स्टेशन येथे सोडण्यास सांगितले. रिक्षा चालवत असताना आमिर शेख यांना थोडे अंधुक दिसू लागले. चालकाला गुंगी आल्याचे रिक्षातील लुटारू प्रवाशांनी हेरले. त्यांनी आमिर यांना वालधुनी जकात नाक्यावर रिक्षा थांबविण्यास सांगितले आणि घात केला. लुटारूंनी आपल्याकडील मोबाइल, घड्याळ आणि काही रोकड हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोध केल्यानंतर ठोसा-बुक्क्याने मारहाण करून रिक्षासह बिर्ला कॉलेजसमोर सोडून पळ काढल्याचे या वयोवृद्ध रिक्षाचालकाने मंगळवारी महात्मा फुले पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. आता या प्रकरणी फरार लुटारूंना हुडकून काढण्याची जबाबदारी स.पो.नि. देविदास ढोले यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details