ठाणे - काळ आला होता, पण वेळ नाही अशी थरारक घटना समोर आली आहे. एक्स्प्रेसच्या इंजिनच्या खाली येऊनही मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आजोबांचे प्राण वाचले आहेत. कल्याण रेल्वे स्टेशनवर रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. मात्र, या घटनेत वाचलेले आजोबा आत्महत्या करण्यासाठी रेल्वे इंजिनसमोर गेल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. हरीप्रसाद शंकर करण असे या आजोबांचे नाव आहे. ते कल्याण पूर्वेतील अडवली-ढोकरी येथील रहीवाशी आहेत.
कल्याण रल्वे स्थानकावरील थरारक प्रकार! एक्स्प्रेसच्या इंजिनखाली येऊनही मोटरमनमुळे वाचले आजोबांचे प्राण एक्स्प्रेसच्या इंजिनाचा पुढचा भाग आजोबांच्या गेला अंगावरून
दुपारच्या सुमारास मुंबईहुन वाराणसीला जाणारी महानगरी एक्स्प्रेस कल्याणच्या प्लॅटफॉर्म नंबर 4 वरून सुटली. त्याचवेळी काही अंतरावर पुढे हरीप्रसाद हे रेल्वेरूळावर आत्महत्या करण्याच्या इराद्याने उभे होते. गाडीनेही अवघ्या सेकंदात वेग धरला होता. रुळांवर उभे असणाऱ्या आजोबांना पाहून एक्स्प्रेसचे मोटरमन एस. के. प्रधान यांनी वारंवार हॉर्नही वाजवला. मात्र, गाडी पुढे येईपर्यंत आजोबा काही जागचे हलले नाहीत. परंतु, मोटरमन एस. के. प्रधान आणि सहाय्यक मोटरमन रवी शंकर यांनी आपले प्रसंगावधान राखून मोठ्या कसरतीने एक्स्प्रेसला ब्रेक लावला. तरीही, तोपर्यंत एक्स्प्रेसच्या इंजिनाचा पुढचा भाग आजोबांच्या अंगावरून गेला होता.
रेल्वे इंजिनखाली पाहिले असता आजोबा सुखरूप
मोटरमन आणि रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. दरम्यान, इंजिनखाली पाहिले असता हे आजोबा सुखरूप असल्याचे त्यांना दिसून आले. पोलिसांनी प्रयत्नपुर्वक आजोबांना इंजिनाच्या पुढील भागातून बाहेर काढले. एक्स्प्रेसचे मोटरमन एस. के. प्रधान आणि रवी शंकर यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानाचे कौतूक करीत रेल्वे प्रशासनाकडून त्यांना बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तर, या घटनेचा व्हिडीओ मध्य रेल्वेने सोशल मीडियावर शेअर करत रुळ न ओलांडण्याचे आवाहन केले आहे.