ठाणे- सकाळपासून ढगाळ वातावरण असले तरी, या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण म्हणजेच कंकणाकृती स्थिती सूर्यग्रहण पाहण्यासाठी ठाणेकरांनी गर्दी केली होती. यावेळी विशेष चष्मा लावून नागरिकांनी हे सूर्यग्रहण पाहिले. हे सूर्यग्रहण कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यातील काही भागातून दिसले असून उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण कंकणाकृती स्थितीत दिसले असल्याची माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.
हेही वाचा -...असे पार पडले या वर्षातील अखेरचे ग्रहण
या विषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की, नऊ वर्षांपूर्वी १५ जानेवारी २०१० ला झालेल्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती भारतातून दिसली होते. खग्रास सूर्यग्रहणावेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब संपूर्ण सूर्यबिंबाला झाकून टाकू शकत नाही. त्यामुळे जरी चंद्रबिंब सूर्यबिंबाच्या आड आले तरी सूर्यबिंबाची गोलाकार कडा दिसतच राहते. याला ‘ फायर रिंग ‘ असेही म्हणतात. अशावेळी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते. आज अशीच कंकणाकृती अवस्था दक्षिण भारतातील कोइम्बतूर, धरपूरम, दिंडीगुल, एरोडे, कान्हनगड, कन्नूर, करूर, कोझीकोडे, मदेकेरी, मंगलोर, मंजेरी, उटी, फाल्लकड, पायन्नूर, पोलची, पुडुकोटल, तिरूचीपल्ली, तिरूर इत्यादी ठिकाणांहून सकाळी सुमारे दोन ते तीन मिनिटे दिसले.
खग्रास सूर्यग्रहणात छायाप्रकाश लहरी, डायमंड रिंग, करोना, दिवसा काळोख झाल्यामुळे होणारे ग्रह-तारका दर्शन जसे होते तसे अविष्कार कंकणाकृती सूर्यग्रहणात दिसत नाहीत. फायर रिंगचे अद्भूत दर्शन मात्र होते.