ठाणे - कोरोनाकाळात राज्याची आणि देशाची आर्थिक परिस्थिती हलाखिची झाली होती. ही परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्क दरात कपात (Stamp duty Department) केली होती. त्याची मुदत संपल्यावर आता एक टक्का वाढ होणार आहे. त्यामुळे मार्च महिन्यात विक्रमी दस्त नोंदवत 555 कोटी 14 लाख 35 हजार 900 रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. नव्या आर्थिक वर्षात मुद्रांक शुल्क विभागाकडून एक टक्का वाढ होणार आहे. त्यामुळेच ही कमाई झाल्याचे समोर आले आहे.
एका महिन्यात मिळवलेल्या या उत्पन्नात ठाणे शहर आणि ठाणे ग्रामीन विभागाचा समावेश आहे. ठाणे शहरातील बाळकूम, मासुंदा तलाव, भाईंदर, वाशी, सीबीडी, कोपरखैरणे, कळवा, मिरा रोड, नेरूळ या बारा कार्यालयांमध्ये मार्च महिन्यात एकूण 14013 दस्तांची नोंदणी झाली आणि या दस्त्यामुळे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी मिळून 440 कोटी 8 लाख 38 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यासोबत ठाणे ग्रामीण भागात उल्हासनगर, भिवंडी, मुरबाड आणि शहापूर येथील 9 कार्यालयामधून 7800 दस्त नोंदणी करून, त्यातून 115 कोटी पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.