ठाणे -राज्यात आलेल्या महापुरातील पीडितांच्या मदतीसाठी शिवसेनादेखील सरसावली आहे. त्यानुसार ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक हे पूरग्रस्तांसाठी 1 कोटींचा मदतनिधी उभारणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील माजरेवाडी हे गाव दत्तक घेतले जाणार आहे, अशी माहिती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.
पूरग्रस्तांसाठी 1 कोटीचा निधी, एक गावही घेणार दत्तक - प्रताप सरनाईक कोल्हापूर जिल्ह्यातील माजरेवाडी हे गाव दत्तक घेणार
सांगली, सातारा, कोल्हापूर आणि कोकणात महापूराने अक्षरशः थैमान घातल्याने होत्याचे नव्हते झाले. अनेकांचे संसार बुडाले. या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी ठाणेकर सरसावले आहेत. त्यानुसार शिवसेना आमदार प्रताप सरनाईक फाउंडेशन, विहंग चॅरिटेबल ट्रस्ट,संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि रोटरीच्या माध्यमातून पुरात उध्वस्त झालेले कोल्हापूर जिल्ह्यातील एक गाव दत्तक घेण्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर ठाण्यात आयोजित केलेल्या फूड फेस्टिव्हलच्या माध्यमातून तब्बल एक कोटींचा निधी पूरग्रस्तांना दिला जाणार आहे, अशी माहिती सरनाईक यांनी दिली.
ठाण्यात 15 ते 18 ऑगस्ट या कालावधीत आयोजित केलेल्या गायमुख मान्सून म्युजिक अँड फूड फेस्टिवलच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी 1 कोटींचा मदतनिधी उभारला जाणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील माजरेवाडी हे 325 घरांचे अडीच हजार लोकसंख्येचे गाव दत्तक घेतले जाणार आहे. गावात फवारणी करून मलवाहिन्या तयार केल्या जाणार आहेत. यात भांडी-कुंडी ठाणे हॉटेल असोसिएशनकडून रेमंड कंपनीतर्फे कपडे पुरवले जाणार आहेत. संपूर्ण शेती उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांना लागणारे बी-बियाणेदेखील पुरवले जाणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
ही वेळ पूरग्रस्तांसाठी धावून जाण्याची - सरनाईक
महापूरमध्ये लोकांचे सर्वस्व वाहून गेले असताना कुणी सेल्फी काढले, कोण हसले यावर चर्चा करण्यापेक्षा ही वेळ पूरग्रस्तांसाठी धावून जाण्याची आहे. राजकारण करायला 365 दिवस आहेत. तेव्हा विविध माध्यमातून पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी आपण आग्रही असल्याचे सरनाईक म्हणाले. त्याचबरोबर हिंदू संस्कृतीनुसार सण साजरे करताना अवाढव्य खर्च टाळून तो निधीही पूर बाधितांसाठी द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.