ठाणे :शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेनेच्या डोंबिवली पश्चिमेतील पंडित दिन दयाळ रस्त्यावरील कदम इमारतीमधील शिवसेना शाखेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या तसबिरी, फलक का काढले नाहीत, असा जाब ठाकरे गटातील शिवसैनिकांनी शिंदे गटातील शिवसैनिकांना विचारला. या बाचाबाचीतून शाखेतील शिंदे यांचे फलक फाडून शिवीगाळ करत शिंदे गटातील शिवसैनिकाला जीवे मारण्याची धमकी ठाकरे गटातील शिवसैनिकांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान शहरप्रमुख विवेक खामकर आणि श्याम चौगुले यांना पोलिसांनी शनिवारी कल्याण न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ठाकरे गटातील शिवसैनिकांनी शाखेतील १५ हजार रुपये, महत्वाचे कागद चोरुन नेल्याचा आरोप तक्रारदारांकडून करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री पं. दिन दयाळ रस्त्यावरील शिवसेना शाखेत हा प्रकार घडला. या वादावादीनंतर दोन्ही गटांनी परस्परांविरुध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या. पोलिसांनी गुन्हे दाखल करुन ठाकरे गटातील दोन पदाधिकाऱ्यांना आज पहाटे अटक केली. या गटातील दोन महिला पदाधिकाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. ठाकरे गटातील शिवसेना शहरप्रमुख विवेक हरिश्चंद्र खामकर (५२), श्याम नाना चौगुले (५५) यांना अटक करण्यात आली आहे. शहर महिला संघटक कविता गावंड, विभाग संघटक किरण मोंडकर यांचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांनी सांगितले, शिंदे गटातील शिवसैनिक पराग म्हात्रे (३०, रा. भरत जोशी इमारत, देवी चौक) हे अभ्युदय बँके समोरील शिवसेना शाखेत शुक्रवारी रात्री आठ वाजता बसले होते. त्यांच्या सोबत युवासेना उपशहरप्रमुख पवन म्हात्रे, वाल्मिक पवार, ज्येष्ठ नागरिक शांताराम साटम, किशोर पत्की बसले होते. यावेळी शाखेत ठाकरे गटातील शहराध्यक्ष खामकर, कविता, किरण, श्याम पदाधिकारी आले. त्यांनी शिंदे गटातील तक्रारदार पराग यांना ‘तुम्ही शाखेत प्रतिज्ञापत्र भरून घेण्याचे काम का करत नाहीत’ असा प्रश्न करुन शाखेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जुने फलक, तसबिरी का काढल्या नाहीत म्हणून जाब विचारला. पराग यांनी त्यांना उत्तरे देण्यास सुरुवात करताच ठाकरे गटातील शिवसैनिकांनी शाखेतील शिंदे यांचे जुने फलक शिवीगाळ करत फाडून टाकले. शाखेतील टेबलावर पिशवीत ठेवलेले १५ हजार रुपये, महत्वाची कागदपत्रे चोरी करून निघून गेले. अचानक घडलेल्या या प्रकाराने शिंदे गटात अस्वस्थता पसरली. ही माहिती शिंदे गटाने पक्षाच्या वरिष्ठांना दिली. रात्रीच याप्रकरणी पराग म्हात्रे यांच्या तक्रारी वरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन ठाकरे गटातील शिवसैनिकांना अटक केली.
तर ठाकरे गटातील महिला संघटक कविता गावंड यांनी शिंदे गटातील पराग म्हात्रे यांनी आम्हा महिला कार्यकर्त्यांना मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार केली आहे. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करुन घेतला आहे. किरण, लता नाटलेकर, सानिका खाडे आपण स्वता शाखेत उध्दव, आदित्य ठाकरे यांच्या तसबिरी लावण्याच्या सूचना पराग यांना केल्या. त्याचा राग शिंदे समर्थक पराग यांना आला. शहराध्यक्ष खामकर यांनी प्रतिज्ञापत्र भरुन घेण्याची सूचना केली. त्यावेळी पराग म्हात्रे यांनी या महिला पदाधिकाऱ्यांना शाखेत पाठवू नका, त्या येथे गैरप्रकार करतात आणि भांडणे लावतात. या महिला येथे आल्या तर त्यांना बघून घेण्याची धमकी पराग याने दिली, असे कविता गावंड यांनी तक्रारीत म्हटले आहे. या घटनेवरुन डोंबिवलीत शाखा ताब्यात घेण्यावरुन येत्या काळात ठाकरे, शिंदे गटात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.