ठाणे -ठाण्यातील शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde Banners) यांचा वाढदिवस ९ फेब्रुवारीला आहे. या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील वागळे इस्टेटमधील चेकनाका येथे 'एकनाथ शिंदे यांनी भावी मुख्यमंत्री व्हावे' अशा आशयाचे बॅनर (banners of Eknath Shinde as CM) शिवसैनिकांनी लावले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चेंना उधाण आले आहे. अशा प्रकारचा एक बॅनर विधानसभेच्या निवडणुकीनंतरही लागला होता. आता पुन्हा वाढदिवसानिमित्ताने अशा प्रकारचे बॅनर लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
- बॅनरच्या माध्यमातून राज्य सरकारपर्यंत निरोप -
महाविकास आघाडी सरकारमध्ये एक महत्त्वाची जबाबदारी असलेले एकनाथ शिंदे हे सरकारच्या स्थापनेपासूनच मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारपैकी एक होते. त्यावेळी झालेल्या घडामोडीनंतर त्यांना मुख्यमंत्री पद मिळाले नाही. मात्र, आता भविष्यात त्यांची वर्णी राज्याच्या मुख्यमंत्री पदावर लागावी म्हणून ठाण्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा निरोप अप्रत्यक्षरित्या राज्य सरकारला दिला आहे.
- एकनाथ शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग -
एकनाथ शिंदे यांनी आपल्या कारकिर्दीत संपूर्ण महाराष्ट्रभरात फिरून संघटन बांधले आहे. आपत्कालीन परिस्थितीत सेवा देणे, नागरिकांच्या अडचणीला धावून जाणे अशा प्रकारची अनेक कामे त्यांनी केली आहेत. त्यामुळे राज्यभरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. राज्याच्या बाहेर देखील एकनाथ शिंदे यांनी अनेकदा वेगवेगळ्या घटनांमध्ये मदत केली आहे.