ठाणे : भर रस्त्यात दहशत पसरावी अशा परिस्थितीत तलवार हातात घेऊन येथील काही तरुण नाचत आहेत. तसेच, याच तलवारीने मित्राच्या वाढदिवसाचा केक कापला. हा प्रकार उल्हासनगरमध्ये बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडला होता. हा व्हिडीओ पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यानंतर तलवारीने केक कापणाऱ्या तरुणांचा शोध घेऊन उल्हासनगर पोलिसांनी आज त्यांना ताब्यात घेतले आहे.
ठाणे येथील उल्हासनगरमध्ये बुधवारी सायंकाळच्या सुमारास तलवारीने मित्राच्या वाढदिवसात केक कापताना काही तरुण तलवार घेऊन घातला धुडगूस
उल्हासनगरमधील कॅम्प नंबर एक भागातील शास्त्री नगर परिसरात अशोक यादव यांचा वाढदिवस बुधवारी नजमा इमारतीच्या समोरील रस्त्यावर साजरा करण्यात आला. यावेळी काही तरुण जमले होते. शिवाय इथे सोशल डिस्टनसिंग तर सोडाच साधा मास्क देखील कोणी लावला नव्हता. दरम्यान, अशोकचा वाढदिवस साजरा करताना या तरुणांनी भर रस्त्यात एक तलवार हातात घेऊन डांन्स केला आणि वाढदिवसासाठी आणलेला केकही या तलवारीने कापला.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
तलवारीने केक कापल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तसेच, कोरोना काळात नियमांचे उल्लंघन करून अशाप्रकारे वाढदिवस साजरा करणाऱ्या या टोळक्याला पोलीस कधी आवरणार असा प्रश्न नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर उपस्थित केला आहे. त्यामुळे उल्हासनगर पोलिसांनी व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच, पुढील तपास सुरू आहे.