ठाणे - टाळेबंदीच्या काळात शहर पोलीस दलातील कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या कर्मचाऱ्यांची जातीने काळजी घेणारे ठाणे पोलीस आयुक्तांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना उपचारासाठी मुंबईच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या टाळेबंदीच्या काळात ठाणे पोलीस दलाने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवरील कारवाई असो किंवा स्थलांतरीत मजुरांना घरी पोहचवण्याचे कार्य असो, हे सर्व काम पोलिसांनी मोठ्या कष्टाने पार पाडली आहेत.
याच काळात ठाणे पोलीस दलातील अनेक अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित होऊ लागले होते. आजारी झालेल्या आपल्या योद्ध्यांचे मनोबल वाढवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी उपचार घेणाऱ्या सर्व पोलिसांची जातीने स्वतः काळजी घेऊन त्यांची विचारपूस करत होते. आपल्या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कुटुंबियांप्रमाणे काळजी घेणारे ठाणे पोलीस आयुक्त स्वतः कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.
रविवारी रात्री त्यांना मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.