ठाणे -शहरातील रिक्षाचालकांचा मुजोरपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. एका तरूणाला भाडे नाकारून त्याला जखमी केल्यानंतर रिक्षाचालकाने तेथून पळ काढला. या प्रकरणी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नौपाड्यात मुजोर रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल, तरूणाला केले जखमी - ठाणे
ठाण्यात रिक्षाचालकांचा मुजोरपणा वाढल्याचे दिसत आहे. नौपाड्यात एका तरूणाला भाडे नाकारून त्याला जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
तक्रारदार महेश धनावडे (रा. बोरिवली) हा १५ ऑगस्टला शिवशाही बसने बोरिवली येथून वागले इस्टेट येथे बहिणीच्या घरी रक्षाबंधनाचा आला होता. महेश हा खोपट येथे उतारल्यानंतर त्याने तेथील रिक्षा स्टॅण्डवरील रिक्षा क्रमांक एमएच ०४ ६१०३ च्या रिक्षा चालकाला इंदिरा नगर येथे जाण्याबद्दल विचारले. तेव्हा रिक्षाचालकाने नकार दिला. यानंतर महेशने रिक्षावाल्यांची नेहमीचीच नाटके आहेत, असे म्हटल्यानंतर याचा राग आल्याने रिक्षाचालकाने महेश याची कॉलर पकडून त्याच्या कपाळावर रिक्षाची चावी मारली. यात महेशच्या कपाळाला जखम झाली. या दरम्यान एका बाईक चालकाने महेशला जवळच्या राबोडी पोलीस ठाण्यात नेले. राबोडी पोलिसांनी महेशला प्रथम सिव्हिल रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचार केले त्यानंतर नौपाडा पोलीस ठाण्यात रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी नौपाडा पोलीस रिक्षा चालकाचा शोध घेऊन पूढील तपास करत आहे.