ठाणे -अडीच वर्षे चाललेले राज्यातील महविकास आघाडी सरकार एकनाथ शिंदे यांनी आपल्या बंडानंतर उलथवून टाकले. एकनाथ शिंदे यांच्या रूपाने ठाणे जिल्ह्याला प्रथमच मुख्यमंत्रीपदाचा बहुमान प्राप्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून प्रामुख्याने एमएमआरडीएच्या ( Mumbai Metropolitan Region Development Authority ) धर्तीवर ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करावे. जेणेकरून पायाभूत सुविधा, रस्ते, ड्रेनेज, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, दळण वळण,पाणी पुरवठा आदी महत्वाच्या बाबींचा जलद विकास करणे सोपे जाईल. यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी केल्याचे सांगितले. ( Thane NCP Demand To CM Shinde )
हेही वाचा -66 Thane corporators : ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या 66 नगरसेवकांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट
वाहतूक प्राधिकरण स्थापन करावे - ठाणे जिल्हातील विकासाच्या दृष्टीने राज्य शासनाशी संलग्न विविध प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी केली आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील विविध विकास कामांना न्याय देण्यासाठी लवकरात लवकर राज्य शासनाने मान्यता द्यावी अशी मागणी देखील हिंदुराव यांनी केली आहे. तसेच कल्याण मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी माजी अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रस्तावित केलेला 400 कोटींचा निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा, कल्याण आणि मुरबाड तालुक्यात महिलांसाठी इंडस्ट्रीयल इस्टेट सुरू करावी. त्याच प्रमाणे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आरक्षित जागेवर प्रस्तावित शासकीय रुग्णालयाला मान्यता द्यावी, बेस्टच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यासाठी एकच वाहतूक प्राधिकरण स्थापन करावे, मेट्रो रेल्वेचा कल्याणपुढील उल्हासनगर, अंबरनाथ, टिटवाळा, बदलापूर आणि मुरबाडपर्यंत विस्तार करावा अशी मागणी आपण यावेळी केल्याचे प्रमोद हिंदुराव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.