ठाणे -कल्याणच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कोरोनाबाधितांच्या मृत्युनंतर मृतदेहाची बांधणी साध्या पॉलीथीन पिशवीत केली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी मृतदेहांची विल्हेवाट लावणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच महापालिकेकडून योग्य ती खरबदारी घेतली जात असल्याचा दावा केला आहे. तर महापालिकेच्या आरोग्य विभागाने देखील मृतदेहांची योग्य खरबदारी घेतली जात असल्याचे स्पष्ट केले आहे.
कोरोनाबाधित मृतदेहाच्या सॅनिटायजेशनबाबत माहिती देतांना ठाणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. मुरुडकर
सर्वच महापालिकांमध्ये कोरोना मृतदेहाच्या सॅनिटायजेशनचा प्रश्न ऐरणीवर आला आहे . ठाणे महापालिकेने मात्र कोरोनाबाधित मृतदेहाची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जात असल्याचा दावा केला आहे. ठाणे महापालिकेकडे सोडियम हायप्लोक्लोराईटचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. एका मृतदेहाच्या सॅनिटयजेशनसाठी केवळ दीड ते दिन लिटर एवढेच द्रव्य लागते. त्यामुळे एका मृतदेहाच्या सॅनिटायजेशन खर्च हा केवळ १५ रुपयांपर्यंत होत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. एखाद्या कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यु झाला तर त्याचा मृतदेह योग्य रितीने बॉडीबॅग्जमध्ये पॅक केला जात आहे. तसेच आता नव्या स्वरुपाच्या बॉडीबॅग्ज आल्याने त्यामध्ये मृताचा चेहरा हा स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांना बोलावून मृतदेहाची ओळख पटवली जाते. त्यानंतर त्यांची सही घेऊन मृतदेह शासकीय नियमानुसार स्मशानभुमीत अंत्यविधीसाठी पाठविला जातो. त्यापूर्वी मृतदेह संपूर्णपणे सॅनिटाईज केला जात असल्याची माहिती महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मुरुडकर यांनी दिली. महापालिकेकडे पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या स्मशानभुमीतून कर्मचाऱ्यांकडून देखील मृतदेहाची योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. त्यांना पीपीई कीट, हॅन्डग्लोज, मास्कही दिले जातात. मृतदेह रुग्णवाहिकेतून नेत असतांना त्यामधील कर्मचाऱ्याकडूनही सॅनिटाईज केले जात आहे. तसेच स्मशानभुमीत मृतदेह आणल्यानंतर त्याच्यावर योग्य त्या प्रकारे अंत्यसंस्कार केले जात असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले.