ठाणे - शहापूर तालुक्यातील माहुली धबधब्यात प्रादेशिक वनविभागाचे कर्मचारी कुंदन वामन भोईर यांच्या मृत्यू झाला आहे. त्यांच्या पत्नीने घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन न्याय देण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. याबाबत मृतक वनकर्मचारी कुंदन यांची पत्नी सुप्रिया भोईर यांनी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मित्रांनी आग्रह केल्याने धबधब्यावर - मागील आठवड्यात शुक्रवारी दुपारी वनकर्मचारी कुंदन भोईर यांचा माहुली धबधब्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचा मृतदेह येथे फक्त पँन्ट घातलेल्या तर उर्वरीत शरीर उघडे अशा अवस्थेत आढळून आले होते. यादिवशी पतीला फोन करकरुन माहुली धबधब्यात ये म्हणून मित्र आग्रह धरीत होते. शिवाय पतीच्या मृत्यूनंतर सर्वजण तेथून पळून गेले. त्यामुळे कुठल्यातरी अज्ञात कारणावरुन पतीचा घातपात घडविण्यात आला आहे, असा संशय सुप्रिया भोईर यांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळावरील त्यांच्या सोबतच्या ११ जणांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या ११ जणांमध्ये वनकर्मचाऱ्यांसह एका शिक्षकाचाही समावेश आहे.