ठाणे - भरदिवसा रहदारीच्या रस्त्यावर एकाने दोघा तरुणांवर धारधार असलेल्या आफ्रिकन चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली ( Knife attack on two person in thane ) आहे. ही घटना कल्याण पूर्वेकडील रेडी डि मार्टच्या समोरील रस्त्यावर घडली आहे. मात्र पोलिसांनी वेळेतच घटनेचे गांभीर्य ओळखून त्या हल्लेखोराला आफ्रिकन चाकूसह प्रसंगावधराखत जेरबंद केल्याने पुढील होणारा मोठा अनर्थ टळला. मयुर रामदास दराडे, ( रा. हनुमान नगर कल्याण पुर्व ) असे जेरबंद केलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. तर विशाल कमलाकर पाटील, दिपेश रविंद्र रसाळ (रा. द्वारली गाव) असे चाकू हल्ल्यात गंभीर जखमीची नावे आहेत.
हल्लेखोर तरुणांवर चाकूने वार करीत असतानाच पोलीस घटनास्थळी -
कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे गोपनिय पथकाचे पोलीस हवालदार प्रविण प्रभाकर देवरे, पोलीस नाईक उत्तम सदाशिव खरात व ए.टी.एस.चे पोलीस नाईक, कुणाल उत्तम परदेशी हे तिघे पोलीस कर्मचारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर के. शेख यांनी दिलेल्या आदेशानुसार शुक्रवारी दुपारी १ वाजल्याच्या सुमारास पोलीस ठाण्याच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविणे बाबत व्यापाऱ्यांना आवाहन करीत होते. त्यातच सुमारास काटेमानेवली नाका ते चिंचपाडाकडे जाणाऱ्या रोडवर आवाहन पत्रिका वाटप करीत असताना दुचाकीने जातांना रेडी डि मार्ट जवळ अचानकपणे रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली होती. ही वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी गेले असता या ठिकाणी तीन इसम एकमेकांशी भांडण करत असल्याचे दिसले. त्यापैकी एकाच्या हातात असलेल्या धारदार चाकुने दोन तरुणांवर सपासप वार करीत होता. त्यावेळी तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखुन स्वत:चे जीवाची परवा न करता शिताफीने चाकु मारणाऱ्या हल्लेखोराला जमीनीवर खाली पाडुन, त्याच्या हातातील रक्ताने माखलेला चाकू हिसकावून घेवून त्यास ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणले.